ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
हवेतूनही कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचा दावा जागतिक दर्जाचे आरोग्य नियतकालिक ‘द लॅन्सेट’ने केला आहे. कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा अभ्यास करुन तसेच तज्ज्ञांशी यासंदर्भात चर्चा करुन ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडातील सहा संशोधकांनी हा अहवाल तयार केला आहे.
या अहवालाच्या मुख्य लेखिका ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या त्रिश ग्रीनहॉल या आहेत. हवेतून विषाणू पसरत असल्याचा दावा करत त्यांनी याचा पुरावा दिला आहे. त्यानुसार, वजनदार ड्रॉपलेट हवेत टिकत नाहीत, ते जमिनीवर पडतात त्यामुळेच संसर्ग फैलावतो. एका कार्यक्रमात एक संक्रमित व्यक्ती सहभागी झाली. तिने 53 जणांना संक्रमित केले. हा व्यक्ती कोणाच्याही संपर्कात आला नव्हता. त्यामुळे हवेतून विषाणू पसरल्याचे स्पष्ट होते. हवेतून पसरणारा संसर्ग रोखण्यावर भर दिला पाहिजे. मोकळय़ा जागेत संसर्ग कमी फैलावतो, उलट बंद जागांमध्ये संसर्ग मोठय़ा प्रमाणावर पसरतो. तसेच लक्षणे नसलेल्या लोकांकडूनच संसर्गाचा जास्त फैलाव होत आहे.
केवळ मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स हे कोरोना रोखण्यासाठी सक्षम नाहीत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेसह इतर संघटनानी कोरोना संसंर्ग फैलावण्याची व्याख्या बदलली पाहिजे, असेही या अहवालात म्हटले आहे.









