हवामान बदलामुळे गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने निसर्गाचा कोप अनुभवायला येत आहे. त्यात आता पाकिस्तानातून आलेले धुळीचे वादळ हाहाकार उडवत आहे. आता हे संकट किती दिवस त्रास देणार याची चिंता सर्वांना लागली आहे. गुजरातमार्गे मुंबई आणि राजस्थानपर्यंत धडकलेले धुळीचे वादळ मुंबई आणि पुण्यावर रविवारपासूनच पसरले होते. धुळीने सारे आकाश व्यापलेले पाहून हे काय नवे संकट? अशी लोकांची भावना झाली असेल तर ती चुकीची नाही. पाकिस्तानात या धुळीच्या वादळाने हाहाकार उडवलेला आहे. या वादळाबरोबरच परतलेली थंडी आणि महाबळेश्वर, कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई-पुण्यासह काही भागात झालेला पाऊस, बदललेले वातावरण याचा धसका सर्वसामान्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात अनुभवलेला थंडीचा कहर आणि त्यानंतर थोडेसे बदललेले वातावरण यामुळे दिलासा मिळतो ना मिळतो तोच पुन्हा नव्याने संकट उभे राहिल्याने शेतकऱयांसह शहरी भागही हबकून गेला आहे. ग्रामीण भागात थंडी आणि धुक्मयामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाली आहे. मोहर गळून पडू लागले आहेत. सलग वर्षभर असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोहोर आलेच नाहीत. काही ठिकाणी आलेला मोहर या धुक्मयांनी झडून गेला. त्यामुळे फळ बागायतदार विशेषतः आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकरीसुद्धा या तडाख्यातून सुटला नाही. गहू, हरभऱयाचे पीक हे सार्वत्रिक आहे. त्याची उगवण क्षमता घटलेली आहे. त्याचा परिणाम पुढच्या वर्षावर आणि एकूण पुरवठय़ावर होणार आहे. त्यातच नव्याने धुळीच्या वादळाची भर पडल्यामुळे हे संकट आता नवीन कोणते आव्हान उभे करणार याची चिंता सर्वसामान्यांना लागली आहे. मुंबई, पुण्यावर पसरलेल्या धुक्मयाच्या चादरीने अंगावर काटा उभा राहतो आहे. वाहनांवर पडलेली पांढरी धूळ पाहिली की हे संकट आता नवीन कोणते दिवस दाखवणार, याची चिंता वाटल्यावाचून राहत नाही. तसा तर थंडीचा काळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असा मानला जातो. मात्र गेल्या काही दिवसात वाढलेल्या थंडीने आधीच राज्यात तापाची आणि थंडीची साथ आल्यासारखी स्थिती होती. त्यातून सावरताना हे नवे संकट उभे राहिले आहे. पन्नास वर्षांपूर्वी 1971-72 साली आलेल्या महाभयंकर दुष्काळाच्या वेळेपासून देशात हवामान बदलाची केवळ चर्चा सुरू आहे. तेव्हापासून अल् निनोची चिंता वाहिली जात आहे. पण त्याच्यापुढे कोणतीही हालचाल होत नाही. नाही म्हणायला महाराष्ट्र सरकारने हवामान बदल हा विषय जरा अधिक मनावर घेतला आहे. पण प्लास्टिक बंदीपासून सरकारच्या विविध धोरणांचे काय होत आहे हे उघडय़ा डोळय़ांनी आपण पाहतच आहोत. गेल्यावषी अवकाळी, ढगफुटी, महापूर, चक्रीवादळे यांची एकामागून एक आव्हाने येऊन आदळली. त्याच्यातून शहरी आणि ग्रामीण भागाचे फार मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले. गतवषीच्या पावसाळय़ात आलेल्या महापुराने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणची दाणादाण उडवून टाकली. सांगली, कोल्हापूर, चिपळूण अशा शहरांची पुरती वाट लावली. लोकांच्या मनात एकप्रकारची धास्ती निर्माण होण्याचे आणि ग्रामीण भागाचे अपरिमित नुकसान होण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. मुंबई, ठाणे, पुणेसारखी महानगरेही या तडाख्यातून सुटलेली नाहीत. तीन वर्षापूर्वी अचानक झालेल्या पावसाने उल्हास नदीला आलेल्या पुराने महालक्ष्मी एक्सप्रेस अचानक रेल्वे खात्याशी संपर्क तुटल्यासारख्या स्थितीत अडकली. शेकडो जीव वाचवण्यासाठी एनडीआरएफचे पथक रवाना करावे लागले आणि मार्ग बदलून ती गाडी प्रचंड उशिराने कोल्हापूर या अंतिम मुक्कामी पोहोचली. अशी जीवावर बेतणारी संकटे निसर्गाच्या या तडाख्यात सारखी, सारखी येत आहेत. खरीप आणि रब्बीच्या हंगामानंतर पीक काढणीला आले असताना संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होऊन जमीनसुद्धा खरवडून गेली. असा अनुभव विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राने घेतला. या संकटाने अनेक लोकांनी हबकी खाऊन प्राण सोडले. काहींनी आत्महत्या केल्या. त्यात तरुणांची संख्या मोठी होती. 2019 सालच्या मार्च महिन्यापासून संपूर्ण भारत आणि जग कोरोनाच्या तडाख्यात सापडलेले आहे. मृतदेह पुरायला आणि जाळायलासुद्धा लोकांना उसंत मिळेल इतके गंभीर वातावरण या काळात भारताने अनुभवले. वैतागलेल्या लोकांनी मृतदेह नदीत सोडून दिले, अंत्यसंस्कार करणारे लोक कोरोना होऊन निवर्तले, उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचारीही दगावले. वैद्यकीय कर्मचाऱयांची कमतरता भासू लागली. रस्त्यावर बंदोबस्ताला असणारे पोलीस आणि सरकारी कार्यालयात काम करणारे कर्मचारीसुद्धा यात बळी पडले. सर्वसामान्य माणसांची तर मोजदादच नाही. या महामारीत नेमका किती लोकांचा मृत्यू झाला हे अजूनही सहज समजू शकत नाही. सरकारी मदत मिळण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र मिळणेही लोकांना मुश्कील झाले आहे. इतके गंभीर वातावरण आहे. ओमीक्रॉनपाठोपाठ नव्याने येऊ लागलेल्या व्हेरियंटची मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेऊन 30 जानेवारीपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवली आहे. बदलत्या वातावरणात ही आव्हाने सत्त्वपरीक्षा पाहत असताना यातून स्वतःला जपणे हेच प्रत्येकासमोरचे आव्हान आहे. शतकांतून अशी आव्हाने समाजासमोर उभी रहात असतात. उजाडण्यापूर्वी अंधार गडद होतो; तशी ही स्थिती आहे. यात टिकाव धरणे हेही खूप महत्त्वाचे आहे. नुकसान झाले आहेच, पण त्यातून आता सावरणेही खूप महत्त्वाचे आहे.
Previous Articleज्ञाते लोक व्यवहारिक युक्तीने आपले कार्य साधतात
Next Article नेक्झू मोबिलिटीची इलेक्ट्रिक सायकल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








