वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विमान उद्योगाने आता कुठे सुरूवात केली असताना या महिन्यात हवाई इंधनाचे दर 50 टक्क्यांनी वाढल्याने कंपन्यांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे. हवाई प्रवासाकरीता लागणाऱया इंधनाचे प्रति किलो लिटर दर आता (दिल्ली) 33 हजार 575 रुपये असणार आहेत. मागच्या महिन्याच्या तुलनेत इंधन दरात 11 हजाराने वाढ झाली आहे. कोलकाता, चेन्नई येथील हवाई इंधनाचे अनुक्रमे दर यापुढे 38 हजार 543, 34 हजार 569 रुपये असणार आहेत. गेले दोन महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हवाई सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आता कुठे सेवा सुरू करण्यात आली आणि इंधनाचे दर वाढवल्याने कंपन्यांना खर्चाचा भार उचलावा लागणार आहे. एकंदरच संकटातून हवाई कंपन्यांना मार्ग काढावा लागणार असून परिणामी विमान प्रवास तिकीटाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मधली सीट रिकामी ठेवा
दरम्यान विमानातील मधली सीट रिकामी ठेवण्याचे आदेश नागरी हवाई उड्डाण विभागाने दिले आहेत. तसे न केलेले आढळल्यास संबंधीतांवर कारवाई करण्याचेही सांगण्यात आले. सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असून सर्वांनीच सुरक्षितता बाळगण्याची गरज आहे. हवाई प्रवासात नागरिकांचे हित लक्षात घेऊन पुरेसं सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने मधली सीट रिकामी ठेवणे गरजेचे असल्याचे विभागाने म्हटले आहे. सर्व विमान कंपन्यांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचेही आदेशात म्हटले आहे.









