प्रतिनिधी / बेळगाव
अंगावरची हळद सुकण्याआधी नवदांपत्यासह चार जण वाहन अपघातात ठार झाले आहेत. यामध्ये महिला पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी नलवडे यांचाही समावेश असून देवदर्शन घेऊन बेळगावला परतताना बेळगाव-बागलकोट रोडवरील चचडी-गोंतमार क्रॉसजवळ हा भीषण अपघात घडला.
वास्कोहून इलकलला जाणाऱया परिवहन मंडळाच्या बसची आय-20 कारला धडक बसून हा अपघात घडला आहे. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, रामदुर्ग पोलीस उपअधीक्षक शंकरगौडा पाटील, सौंदत्तीचे मंडल पोलीस निरीक्षक मंजुनाथ नडुविनमनी, मुरगोडचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
रविवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पूर्वाश्रमीच्या लक्ष्मी हनुमंतराव नलवडे व सध्याच्या लक्ष्मी वासुदेव पवार (वय 60), त्यांचा मुलगा प्रसाद वासुदेव पवार (वय 30), सून अंकिता प्रसाद पवार (वय 27) तिघेही राहणार सहय़ाद्रीनगर, अंकिताची आत्या दीपा अनिल शहापूरकर (वय 50) रा. शहापूर अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवींची नावे आहेत.
केवळ चार दिवसांपूर्वी प्रसाद व अंकिता यांचा विवाह झाला होता. रविवारी केए 22, एमबी 6433 क्रमांकाच्या आय-20 कारमधून नवदांपत्य, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी व दीपा हे सौंदत्ती यल्लम्माच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून बेळगावला परतताना हा भीषण अपघात घडला असून या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
लक्ष्मी नलवडे या एपीएमसी पोलीस स्थानकात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. वर्षभरापूर्वी पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांना बढती मिळाली. त्यानंतर महिला पोलीस स्थानकात त्यांची बदली करण्यात आली होती. सेवानिवृत्ती केवळ महिनाभरावर येऊन ठेपल्यामुळे त्यांनी चार दिवसांपूर्वीच थाटात आपल्या एकुलत्या मुलाचे लग्न उरकले होते. मात्र, नवदांपत्याच्या अंगावरील हळद सुकण्याआधीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
कारचा निम्मा भाग बसखाली सापडला होता. त्यामुळे कारमधील चौघे जण चिरडले गेले. पेनच्या साहाय्याने पोलिसांनी कार बसखालून बाहेर काढली. या अपघाताची माहिती समजताच लक्ष्मी यांच्या कन्या पूजा व पल्लवी मुरगोडला दाखल झाल्या. आपली आई, नवविवाहित भाऊ व वहिनीचा चेंदामेंदा झालेला मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला.
अपघातात चारही जण जागीच ठार झाले असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्याविषयीचा तपशील उपलब्ध झाला नाही. रात्री उशिरापर्यंत मुरगोड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मंत्री मुरुगेश निराणी यांची माणुसकी
चचडी-गोंतमार क्रॉसजवळ हा अपघात घडला, त्यावेळी खाण व भूगर्भ खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी या मार्गावरून जात होते. ते मुधोळला निघाले होते. अपघाताची घटना पाहून त्यांनी आपली कार थांबविली. बसमधील प्रवाशांची विचारपूस करून जखमींना हलविण्यासाठी रुग्णवाहिका मागवली. त्यांना धीर देऊन संबंधित अधिकाऱयांनाही माहिती दिली. त्यानंतर ते पुढे मुधोळला रवाना झाले.
केवळ चार दिवसांपूर्वीच विवाह

लक्ष्मी नलवडे यांचा मुलगा प्रसाद व शहापूर येथील अंकिता यांचा विवाह चार दिवसांपूर्वी गुरुवार दि. 21 जानेवारी रोजी मराठा मंदिर मंगल कार्यालयात झाला होता. रविवारी चौथा दिवस होता. विवाहानंतर देवीच्या दर्शनासाठी कारमधून चौघे जण सौंदत्तीला गेले होते. सौंदत्तीहून परतताना क्रूर काळाने त्यांच्यावर झडप घातली आहे. लक्ष्मी या मूळच्या संकेश्वरच्या असल्याची माहिती मिळाली आहे. केवळ महिनाभरात म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी पोलीस दलातील सेवेतून त्या निवृत्त होणार होत्या. मुलाच्या विवाहासाठी सध्या त्या रजेवर होत्या. घटनेची माहिती समजताच महिला पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील घटनास्थळी रवाना झाल्या.









