विलास मेथर खून प्रकरण, पोलिसांच्या अपयशाबद्दल परिसरात चर्चा
प्रतिनिधी/ पर्वरी/पणजी
साल्वादोर दु मुन्दू येथील तोर्ड पाटो रस्त्यावर वाहनचालकावर पेट्रोल मिश्रीत द्रव्य ओतून जीवघेण्या हल्ला प्रकरणाला 48 तास उलटले हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे या भागातील लोक तर्क वितर्क व्यक्त करून पोलिसांच्या अपयशाबद्दल चर्चा करीत आहेत. या प्रकरणी पोलीस अधिकाऱयांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तपास चालू असल्याचे सांगून पत्रकारांची बोळवण करीत आहेत.
या हल्ल्यात विलास मेथर याचा गोमेकॉत उपचार चालू असताना गुरुवारी 15 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरातील राजकीय नेते, सामाजिक संस्था, राजकारणी, पक्षाच्या पदाधिकाऱयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या अमानुष कृत्यात सामील असलेल्या नराधमाना पोलिसांनी त्वरित अटक करावी यासाठी आमदार रोहन खंवटे, पर्वरी भाजप मंडळ अध्यक्ष कुंदा चोडणकर यांनी पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक यांची भेट घेऊन जलदगतीने तपास लावण्याचा तगादा लावला.
काल शुक्रवार 16 रोजी संध्याकाळी 4 वा. प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वरी पोलीस स्थानकावर मोर्चा काढून उपअधीक्षक एडवीन कुलासो यांची भेट घेतली. यावेळी आरोपीला अटक करावी तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्यात यावा यासाठी पाऊले उचलावी, अशी मागणी केली.
काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकाच्याप प्रवेशद्वारासमोर धरणे धरून आपला निषेध नोंदविला. या मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केले. प्रसंगी काँग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, तसेच जनार्दन भंडारी, पर्वरी मंडळ अध्यक्ष ऍड. शंकर फडते, विल्बर टिकलो, बाबनी चोडणकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात सुरव्यवस्था व प्रशासन नीटपणे चालविण्याकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे दुर्लक्ष होत आहे. दिवसाढवळय़ा खून, महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. गृहमंत्री या नात्याने डॉ. सावंत यांचा पोलीस खात्यावर वचक नाही, असे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.
2012 पासून पर्वरी मतदारसंघात गुंडगिरी वाढली आहे. विलास मेथर सह एकूण तीन खून या मतदारसंघात झाले. त्यापैकी एकही खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले नाही. 2-3 वर्षापूर्वी सुनिता लमाणी या युवतीचा खून दिवसाढवळय़ा साल्वादोर दु मुन्दू येथे झाला होता. खूनी पसार झाला त्याचा शोध लागला नाही. यामुळे या भागात एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. 14 ऑक्टोबर रोजी तिसरा खून झाला. त्याप्रकरणी पोलिसांना अद्याप धागेदोरे सापडले नाहीत. लोक पोलिसांना सहकार्य करीत नसल्याचेही दिसून येत आहे, असे ऍड. शंकर फडते यांनी सांगितले.
यावेळी वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडरी यांनी सरकारच्या बेजबाबदारपणा आणि प्रशासनातील उणीवाबद्दल सरकारवर टीका केली.
याच प्रमाणे आम आदमी पक्षाचे राहुल म्हांबरे, संदेश टिकेकर, ऍड. सुरेंद्र तिवरे यांनी उपअधीक्षक एडवीन कुलासो यांची पोलीस स्थानकात भेट घेऊन विलास मेथर यांच्या खुनाच्या पोलीस तपासाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसुन्न यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर गोवा पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली अनेक पोलीस पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संशयितांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती विलास मेथर खून प्रकरणातील संशयितांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. लवकरच संशयितांना अटक केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली आहे. दिवसाढवळ्या भर रस्त्यात जीवंत जाळून मारण्याच्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. विविध राजकीय पक्षांनी तसेच सुजाण लोकांनीही या प्रकरणा विरोधात आवाज उठविला असून संशयितांना त्वरीत अटक करण्याची मागणी केली आहे. पोलीस खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱयापासून ते कनिष्ठ अधिकाऱयापर्यंत सर्वच तपास कामात जुंपले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरच खुलास होऊन संशयित गजाआड होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.









