एखादी गोष्ट मनाला पटली नाही की म्हातारी माणसं म्हणतात, ‘आमच्या वेळी असं नव्हतं.’ टीव्हीसमोर पालेभाजी निवडत, मटार सोलत किंवा लाह्या खात किंवा जेवत बसलेल्या माणसांची एक गंमत असते. हात कामात किंवा खाद्ययज्ञात गुंतलेले असतात. रिमोट कुठेतरी लांब असतो. मग टीव्हीवरचा कार्यक्रम आवडला नाही तर उठून रिमोट घ्यायचा आणि वाहिनी बदलायचा कंटाळा येतो. चिडचिड होते. ‘छे बुवा! मालिकावाले काहीही दाखवतात!’ म्हणत माणसं करवादतात. अशावेळी मी जुने दिवस आठवतो.
त्या वेळी टीव्ही नव्हता. मन रमवायला लोक विविध भारती, बिनाका गीतमाला वगैरे ऐकत. त्यात ‘पार्शालिटी’ होते अशी तक्रार करीत. सिनेमा बघायला उठून घराबाहेर जावं लागे. वि. आ. बुवा वगैरे विनोदी लेखक तेव्हा सिनेमाची खूप टिंगल करीत. झाडाभोवती पळणारे नायक-नायिका, मारामारी संपल्यावर येणारे पोलीस वगैरे. लोक त्यांची पुस्तके देखील मनापासून वाचत आणि सिनेमादेखील मनापासून बघत.
आताच्या मालिकांप्रमाणे तेव्हा देखील सिनेमात बुद्धीला न पटणाऱया गोष्टी असत. कौटुंबिक सिनेमात वृद्ध बायका कारस्थाने करून नायिकेला छळत. पण हे सगळं दोन-तीन तासात संपत असल्याने मनाला त्रास होत नसे.
हिंदी सिनेमात मोतीलाल, प्राण, रेहमान वगैरे खलनायक देखणे असत. रुबाबदार पोषाखात वावरत. त्यांच्या तुलनेत ढेरपोटे नायक अजागळ सदरे आणि तुमानीत विस्कटलेल्या केसांनी वावरत. तरीही नायिकांना खलनायकापेक्षा नायकच आवडायचे!
नायिकेला किंवा शत्रूला फसवण्यासाठी नायक खोटय़ा दाढीमिशा लावायचे. सगळय़ा प्रेक्षकांना ओळखू येत. मात्र खलनायक किंवा नायिका इतके बुद्दू की दाढीमिशा लावलेल्या नायकाला ओळखू शकत नसत. दोन भावांची गोष्ट असली की नायक उडाणटप्पू आणि त्याचा भाऊ शिकून पोलीस अधिकारी होणार आणि नायकाला गोळी मारणार हे अगदी ठरलेलं असे.
रहस्यकथा असलेल्या सिनेमात खून कोणी केलाय हे काही प्रेक्षकांना ठाऊक असायचं. त्यांनी ते ओरडून सांगितलं की इतर प्रेक्षक सात्त्विक संतापाने त्यांच्या स्त्री-नातलगांचा उद्धार करीत.
टीव्हीवरील मालिकेत एखाद्या पात्राचं वागणं पटलं नाही तर लोक वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर गाऱहाणी मांडतात. आमच्या वेळी चित्रपटगृहातले प्रेक्षक तिथल्या तिथे त्या पात्राला सामूहिक गालीप्रदान करून त्याच्या बेचाळीस पिढय़ांचा उद्धार करीत.
तेही दिवस मजेदार होते. हेही दिवस मजेदार आहेत.








