वार्ताहर / हलगा
हलगा येथील लक्ष्मी मंदिरात सव्वा लाखाची चोरी झाली आहे. सदर घटना मंगळवार दि. 5 रोजीच्या मध्यरात्री घडली आहे. बुधवार दि. 6 रोजी सकाळी नियमितपणे लक्ष्मी देवीचे पुजारी गाभाऱयाचा दरवाजा उघडण्यासाठी गेले असता ही घटना निदर्शनास आली. त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली.
चोरटय़ांनी मंदिराच्या समोरील लोखंडी ग्रीलचे व गाभाऱयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून गाभाऱयात प्रवेश केला आहे. त्यांनी देवीच्या गळय़ातील सोन्याचे दोन तोळय़ांचे मंगळसूत्र, अर्ध्या तोळय़ाची बोरमाळ व नथ यांची चोरी केली आहे. तसेच देवीच्या अंगावरील चांदीच्या अन्य वस्तूंची चोरी केली आहे. यामुळे सुमारे सव्वा लाखाच्या वस्तूंची चोरी झाली आहे.
घटनास्थळी बागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. एच. पठाण यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी ग्राम पंचायत सदस्य सदानंद बिळगोजी, पिराजी जाधव, भुजंग सालगुडे, माजी सदस्य प्रकाश लोहार, अर्जुन कानोजी, दशरथ घोरपडे, रामा कानोजी, मनोज सुतार, बसू सुतार, धनु देसाई, अशोक यादवकर व ग्रामस्थ उपस्थित होते.









