खासगी इस्पितळात सुरू होते उपचार, डेंग्यूमुळे भीतीचे वातावरण : ग्रामपंचायततर्फे जंतूनाशक औषधांची फवारणी
वार्ताहर /किणये
हलगा गावातील एका तेरा वषीय मुलीचा डेंग्यूने बळी घेतला आहे. हर्षदा भीमराव संताजी रा. मरगाई गल्ली असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी 12.15 च्या दरम्यान एका खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. यामुळे हलगा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सारेच जण वैतागून गेले आहेत. बेळगावात कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच तालुक्मयाच्या ग्रामीण भागात डेंग्यूच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. डेंग्यूमुळे हलगा गावातील मुलीचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या सहा दिवसांपासून हर्षदा संताजी हिच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र, तिला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले. हर्षदाची मोठी बहीण हरिप्रिया हिलाही डेंग्यूची लागण झाली होती. तिच्यावर सुद्धा खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. या डेंग्यूच्या आजारातून बरी होऊन हरिप्रिया बुधवारीच आपल्या घरी गेली होती. तिची लहान बहीण हर्षदा हिला डेंग्यूची लागण झाल्यामुळे प्रारंभी वडगाव रोड येथील दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरू होते. हर्षदाची प्रकृती खालावल्याने तिला बुधवारी दुसऱया खासगी इस्पितळात हलविण्यात आले. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच शुक्रवारी हर्षदाची प्राणज्योत मालवली.
शुक्रवारी चारच्या दरम्यान हलगा स्मशानभूमीत हर्षदावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आजी, आई-वडील, दोन बहिणी, एक भाऊ, काका असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.
हलगा गावात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच काही जण आजारी पडलेले असल्याने ग्राम पंचायतीमार्फत जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे. पण या मुलीच्या मृत्यूमुळे गावातील नागरिक सध्या भयभीत झाले आहेत.
शाळेत हुशार विद्यार्थिनी
हर्षदा ही गावातील प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थिनी होती. ती यावषी आठवीच्या वर्गात प्रवेश करणार होती. ती हुशार विद्यार्थिनी होती, असे तिच्या शिक्षकांनी सांगितले. तिच्या मृत्यूमुळे शिक्षकवर्गातही हळहळ व्यक्त करण्यात आली.
बापाची सुरू होती घालमेल
हर्षदाचे वडील हे सेंट्रिंग काम करतात. त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. तीन मुलींपैकी दोन मुलींना डेंग्यूची लागण झाल्यामुळे वडील भीमराव हे अक्षरशः हतबल झाले होते. तरीही आपल्या मुलींना वाचविण्यासाठी, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ते धडपडत होते. गेल्या 15-20 दिवसांपासून दोन्ही मुलींना वाचविण्यासाठी दवाखान्यात राहून त्यांचे प्रयत्न सुरू होते. शुक्रवारी एका मुलीचा मृत्यू झाल्यामुळे ते आक्रोश करीत होते. हे पाहून साऱयांचेच डोळे पाणावून जात होते.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी सुस्त
हर्षदाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला का? याबाबत येळ्ळूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रमेश दांडगी यांना फोनद्वारे संपर्क केला असता अजून आमच्याकडे हर्षदाचा रिपोर्ट आला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच तिच्या मोठय़ा बहिणीला डेंग्यू झाला होता का? याबाबतही विचारले असता तोही रिपोर्ट आता घेणार आहोत, असे उत्तर त्यांनी दिले. यामुळे सदर अधिकारी आपले कर्तव्य योग्यप्रकारे निभावतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









