वार्ताहर/ हलगा
1 नोव्हेंबर काळा दिन सर्व मराठी भाषिकांनी गांभीर्याने कडकडीत हरताळ करून पाळावा. मध्यवर्ती म. ए. समितीने दिलेल्या सुचनेप्रमाणे हा दिन पाळण्यात यावा, असे आवाहन येथे झालेल्या बैठकीत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील कालिंग होते.
मनोहर संताजी यांनी प्रास्ताविक करून म्हणाले की, यावर्षी बेळगाव येथे होणारी सायकल फेरी रद्द झाली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर काळे ध्वज व दंडावर काळ्या फिती लावून हा काळादिन पाळावा. यावेळी सागर बिळगोजी म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर पाळून धरणे आंदोलनात भाग घ्यावा. सर्वांनी काळे मास्क परिधान करावे, असे आवाहन केले.
यावेळी भुजंग सालगुडे, सुनील कालिंग, राजू मोरे आदींनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीला गावातील अनेक म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सागर बिळगोजी यांनी आभार मानले.









