प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-बस्तवाड (ता. बेळगाव) परिसरात चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी भरदिवसा दोन घरे फोडण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली नाही. मात्र, हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मरगाई गल्ली-हलगा येथील परशराम लक्ष्मण बिळगोजी यांच्या बंद घराच्या दरवाजाचे स्क्रू काढून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला आहे. त्यांच्या घरातील चेन व नेकलेस असे दोन तोळय़ांचे दागिने पळविण्यात आले आहेत. मात्र, कपाटात कपडय़ात गुंडाळून ठेवलेले आणखी काही दागिने व रोकड तशीच होती. ते सर्व चोरटय़ांच्या हाती लागले नाही.
दुसरी घटना बसवाण गल्ली-हलगा येथे घडली. राजाराम रामचंद्र कालिंग यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे. किमती ऐवजासाठी चोरटय़ांनी घरात शोधाशोध केली आहे. त्यासाठी घरातील साहित्य विस्कटून टाकण्यात आले होते. राजाराम यांच्या घरीही चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही.
भरदिवसा घडलेल्या या घरफोडय़ांची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोरटय़ांचा माग काढण्यात येत आहे. यासंबंधी शनिवारी रात्री हिरेबागेवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.
बस्तवाड येथेही झाली होती चोरी
25 ऑगस्ट रोजी दुपारी बस्तवाड येथील नारायण गावडू पाटील यांच्या बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून चोरटय़ांनी सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व 60 हजार रुपये रोख रक्कम पळविली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी चोरीचे आणखी दोन प्रकार घडले आहेत.









