वार्ताहर / किणये :
हलगा येथे गुरुवारपासून मोठय़ा उत्साहात व भक्तीमय वातावरणात पंचकल्याण महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवात काढण्यात आलेली रथ मिरवणूक आकर्षक ठरली. मिरवणुकीत हत्ती, घोडे, विविध वेशभूषा परिधान केलेले भाविक यामुळे तालुक्मयातील नागरिकांना एका अनोख्या मिरवणुकीचे दर्शन घडले. नऊ दिवस हा सोहळा सुरू राहाणार आहे.
गुरुवारी सकाळी 6 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहण करून या महोत्सवाला सुरुवात झाली. यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य अशा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अभिषेक, इंद्र प्रति÷ा आदी पूजाविधी झाले. हा महोत्सव प. पू. बालाचार्य सिद्धसेन मुनीमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तब्बल सतरा वर्षांनंतर पंचकल्याण महोत्सव होत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गुरुवारी दुपारी रथ मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सभामंडपात कीर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम झाला. रात्री महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. महोत्सवाला येणाऱया भाविकांसाठी दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत रोज महाप्रसादाचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गेल्या महिनाभरापासून या महोत्सवासाठी मंदिर कमिटीचे सदस्य राबताना दिसत आहेत. कमिटीच्यावतीने महोत्सवाचे योग्यरीत्या नियोजन करण्यात आले आहे. दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. आपल्या देवाची रांगोळी अस्मिता पाटील, सिद्धू व शशिधर या तिघांनी काढली होती. ही रांगोळी पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. रांगोळी रेखाटण्यासाठी 20 तास लागले, अशी माहिती त्यांनी दिली.
कमिटीचे चेअरमन धन्यकुमार देसाई, सुकुमार हुडेद, संतोष पाटील, बाबू देसाई, महावीर अलारवाड, सर्जेराव कंगलगौडा, अण्णासाहेब पाटील, अशोक पायाक्का, धन्यकुमार पायाक्का, विजय देसाई, बाहुबली तवनाप्पा देसाई, बाहुबली गुंडाप्पा देसाई आदी कमिटीचे सदस्य महोत्सवासाठी परिश्रम घेत आहेत. या महोत्सवानिमित्त रोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाची दि. 7 फेब्रुवारी रोजी सांगता होणार आहे.
प. पू. बालाचार्य सिद्धसेन मुनीमहाराज
सर्वांना सुखशांती आणि समृद्धी लाभावी. तसेच समाजामध्ये शांततेची जागृती व्हावी यासाठी या पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावषी महापुरामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. असा महाप्रलय होऊ नये, यासाठी देवाकडे मागणी करीत आहोत. समाजात वाढत असलेला अन्याय, अत्याचार कमी व्हावा, यासाठी महोत्सवात भाविकांना मार्गदर्शन करण्यात येते.