कंत्राटदाराला लावले पिटाळून : शेतकऱयांची निदर्शने : जिल्हाधिकाऱयांकडे धाव
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचा वाद न्यायालयात असताना पुन्हा बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि कंत्राटदाराने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱयांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. तेथे आलेल्या कंत्राटदाराला पिटाळून लावले. शेतकऱयांनी तीव्र निदर्शने केली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेऊन निवेदन देण्यासाठी प्रयत्न केले.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचा वाद न्यायालयात आहे. शेतकऱयांनी या रस्त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या ठिकाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असताना कंत्राटदार हा रस्ता करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
बुधवारी मच्छे येथून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी कंत्राटदार आपली संपूर्ण यंत्रसामुग्री घेऊन दाखल झाला. याची माहिती शेतकऱयांना मिळताच तातडीने धाव घेऊन काम थांबविले.
यावेळी कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरण्यात आले. याचबरोबर अधिकाऱयांनाही जाब विचारण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत रस्ता होऊ देणार नाही. न्यायालयाने आम्हाला स्थगिती दिली आहे. असे असताना तुम्ही रस्ता कसा करता, असा प्रश्न शेतकऱयांनी उपस्थित केला. रस्ता करण्याबाबत तुमच्याकडे रितसर परवानगी आहे का, असे विचारले असता तेथून अधिकाऱयांनी आणि कंत्राटदाराने काढतापाय घेतला. त्यानंतर शेतकऱयांनी रस्त्यावरच मोठे लाकूड पेटवून निदर्शने केली.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेतली. त्या ठिकाणी प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास हेही होते. त्यांना या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. त्यांनीही प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांना न्यायालयात वाद असताना काम कसे सुरू करता, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. यावेळी शेतकऱयांनी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याबाबतची रितसर कागदपत्रे दिली. झिरोपॉईंटपासून रस्ता करण्याबाबत नोटिफिकेशन काढण्यात आले होते. हा झिरोपॉईंट फिश मार्केटजवळ येतो. मात्र अलारवाड क्रॉसकडे झिरोपॉईंट दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि प्रांताधिकाऱयांना शेतकऱयांनी अनेक प्रश्न विचारले. मात्र त्यांनी उत्तर देण्याचेच टाळले. यावेळी रयत संघटनेचे प्रकाश नाईक, राजू मरवे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.