अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी कोंडुसकोप रस्त्यावर छेडले आंदोलन : मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चेसाठी बोलाविण्याचे आश्वासन

प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपासचे काम स्थानिकांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने होत आहे. उत्कृष्ट अशी बासमती भाताची पिकाऊ जमीन या बायपासमुळे नष्ट होणार आहे. याचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्या आणि शेतकऱयांना न्याय मिळवून द्या, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे नेते चंद्रशेखर कोडीहळ्ळी यांनी कृषीमंत्री बी. सी. पाटील व नगरविकास मंत्री बसवराज बी. यांच्याकडे केली.
सुवर्णविधानसौध येथे होत असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी कोंडुसकोप रस्त्यावर आंदोलन छेडले. केंद्र सरकारने जाचक कृषी कायदे मागे घेतले असून राज्य सरकारनेही हे कायदे मागे घ्यावेत, ही शेतकऱयांची प्रमुख मागणी होती. यावेळी शेतकऱयांनी सरकारला आपला निर्णय जाहीर करण्यासाठी ठराविक मुदत दिली होती.
कर्नाटक राज्य रयत संघटना व हरित सेना यांच्या पुढाकाराने होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व चंद्रशेखर कोडीहळ्ळी करत आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी आणि शेतकऱयांशी संवाद साधताना कोडीहळ्ळी यांनी दुपारी अडीच वाजेपर्यंत सरकारला निर्णय जाहीर करण्याची मुदत दिली होती. सरकारकडून कोणताही निरोप न आल्यास किंवा कृषीमंत्री अथवा मुख्यमंत्री यांनी आंदोलनस्थळी येवून आपला निर्णय न जाहीर केल्यास पोलिसांचे कडे तोडून आम्ही सुवर्णसौधला धडक मारू, असा इशारा दिला होता.
दरम्यान शेतकऱयांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक आहे, असे विचारता शेतकरी अजूनही येत आहेत. सरकार शेतकरी विरोधात कार्य करत असल्याने सरकारच्या मनात भीती आहे. म्हणून सरकारला सुरक्षिततेची गरज आहे. आम्हाला अशी भीती नाही, असे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले. दरम्यान पोलिसांचे कडे तोडून सुवर्णसौधला धडक मारण्याच्या चंद्रशेखर यांच्या इशाऱयानंतर पोलीस अधिकाऱयांनी त्यांच्याशी चर्चा करण्यास सुरुवात केली. धडक मोर्चा करू नये यासाठी त्यांच्यावर बराच दबावही घालण्यात आला.
दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास कृषीमंत्री बी. सी. पाटील व नगरविकास मंत्री बसवराज बी. हे आंदोलनस्थळी दाखल झाले. तत्पूर्वी आपली भूमिका स्पष्ट करताना कोडीहळ्ळी यांनी भ्रष्टाचार नष्ट होणारच नाही का? अशी मानसिकता झाली असताना या प्रश्नाला आपल्या चळवळी हे उत्तर आहे. या देशात अजूनही गांधी आहेत हे दिल्लीत आंदोलन करणाऱया शेतकऱयांनी दाखवून दिले आहे, हे राज्य सरकारने दाखवून द्यावे, असे स्पष्ट केले.
यावेळी विविध जिल्हय़ांचे प्रतिनिधी म्हणून सत्यप्पा, गणेश, महांतेश पुजारी, महादेव मडिवाळ, शांतगीरी, रवी, भ्यारेगौडा, रुपा नायक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बेंगळूरची वाट लावून हे सरकार आता बेळगावची वाट लावण्यास आले आहे का? असा प्रश्नही या नेत्यांनी केला. शेतकरी राबतो म्हणून तुम्हाला अन्न मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बायपासला आमचा विरोध राहील… दुपारी कृषीमंत्री व नगरविकास मंत्री आल्यानंतर शेतकऱयांच्यावतीने बोलताना कोडीहळ्ळी यांनी हलगा-मच्छे बायपास रद्द करावा, ही योजना पूर्णतः चुकीची आहे. बेकायदेशीर कृत्य करू नका. झिरोपॉईंट कोठून सुरू होतो याची तुम्हालाच कल्पना नाही. तेव्हा या बायपासला आमचा विरोध राहील, असे स्पष्ट केले व आपण ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्या, अशी मागणी केली. याशिवाय केवळ भात आणि तूर खरेदी केंदे नकोत तर सर्वच धान्य खरेदीसाठी केंदे सुरू करा, खरेदी केंद्रांना निधी द्या, शेतकऱयांच्या किती जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी घेतल्या त्याचा आढावा द्या, अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या. यावेळी कृषीमंत्र्यांनी सरकार शेतकऱयांच्या विरोधात नाही. आम्ही निश्चितपणे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू व तुम्हालाही चर्चेसाठी बोलावू, अशी ग्वाही दिली.









