राष्ट्रीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची मानकरी
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
रांची, झारखंड येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत हलगा-बस्तवाडच्या लक्ष्मी संजय पाटीलने 56 किलो वजनी गटात कांस्य पदक संपादन केले. राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच भाग घेतलेल्या लक्ष्मीने पदक मिळवून बेळगावचे नाव उज्वल केले.
लक्ष्मीने पहिल्या फेरीत झारखंडच्या आरतीकुमारचा 11-3, दुसऱया सामन्यात पॉंडिचेरीच्या पी. दक्षयाचा, तिसऱया सामन्यात केरळच्या धनीया एस. हिचा 7-3, चौथ्या सामन्यात हरियाणाच्या नेहाचा 11-8, पाचव्या सामन्यात गुजरातच्या भूमिकाचा 5-2 अशा गुण फरकाने पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र उपांत्य फेरीत दिल्लीच्या तमन्नाने 7-6 असा एक गुणाने लक्ष्मीचा पराभव केला. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत कोमलकुमारीचा लक्ष्मीने पराभव करुन कांस्य पटकाविले.
लक्ष्मीला मान्यवरांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. ती सह्याद्री कुस्ती संकुलन पुणे येथे सराव करीत असून तिला निलेश पाटील, संदीप पठारे व विजय बराटे यांचे मार्गदर्शन तर युवजन क्रीडा खाते हल्ल्याळचे कुस्ती प्रशिक्षक तुकाराम गौडा यांचे प्रोत्साहन लाभत आहे. लक्ष्मीला ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आर्थिक पाठबळ लाभत आहे.









