ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
सुवर्णसौधजवळ सरकारी जमीन बाकी आहे. ती जमीन बाहेर येणारे भूमाफीया बळकावण्याच्या तयारीत आहेत. तेंव्हा ती जमीन हलगा ग्रामस्थांना गायरान म्हणून मंजूर करावी, याचबरोबर पशुवैद्यकीय केंद्रासाठी देखील जमीन द्यावी, अशी मागणी हलगा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सुवर्णसौध तसेच इतर प्रकल्पासाठी हलगा येथील जमीन हिसकावून घेण्यात आली आहे. गायरान जमीन असू दे किंवा शेतकऱयांच्या जमीनी असू देत त्या बळजबरीने घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे हलगावासीयांना इतर जमीन आता शिल्लक नाही. हलगा गाव हे कृषी प्रधान गाव आहे. या गावामध्ये मोठय़ा प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. त्या शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱयांनी जनावरे पाळली आहेत. जवळपास गावामध्ये 2 हजारांहून अधिक जनावरे आहेत.
या जनावरांना चरण्यासाठी खुली जागा नाही. त्यामुळे शेतकऱयांना जनावरे चरण्यासाठी सोडणे अवघड जात आहे. तेंव्हा सुवर्णसौध जवळील 7 एकर जागा हलगा ग्रामस्थांना गायरान म्हणून द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. सर्व्हे क्रमांक 662/ए मधील ही जमीन आहे. ती जमीन तातडीने ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. वाय. के. दिवटे, ऍड. बसय्या हिरेमठ, कृष्णा संताजी, प्रकाश लोहार, चंद्रू कानोजी, महावीर बेल्लद, कल्लाप्पा संताजी, दिपक कामाण्णाचे, सदानंद बिळगोजी, मल्लाप्पा कालिंग, पिराजी मोरे, बाबु धामणेक,र, बाळू कामती, पिराजी जाधव, शिवाजी संताजी, परशराम बस्तवाडकर, महेश अनगोळकर, प्रफुल्ल मास्तमर्डी, शिवाजी सामजी, सुनील चौगुले, ऍड. आर. एल. नलवडे, प्रकाश लोहार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.