विविध फाऊंडेशनच्यावतीने 50 कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
वार्ताहर / किणये
हलगा गावातील गरजू नागरिकांसाठी मदतीचे हात सरसावले असून विविध फाऊंडेशनच्यावतीने गावातील 50 कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. रिलायन्स फाऊंडेशन, हलगा येथील सागर सेवा फाऊंडेशन, बेळगाव येथील जीवनमुखी फाऊंडेशन, सदाशिवनगर येथील निखिल फाऊंडेशन व रामतीर्थनगर येथील शीतल फाऊंडेशन आदींच्या संयुक्त विद्यमाने ही मदत करण्यात आली.
कोरोना महामारीमुळे लहान-सहान उद्योगधंदे ठप्प झालेले आहेत. काही किरकोळ कामकाज करून उदरनिर्वाह करणाऱया नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा काही गरजू नागरिकांना वरील पाच फाऊंडेशनच्यावतीने जीवनावश्यक साहित्य देण्यात
आले.
तेल, डाळ, साखर आदी साहित्य असून या साहित्याबरोबरच मास्क व सॅनिटायझरही मोफत देण्यात आले.
यावेळी डॉ. संजय डुमगोळ उपस्थित होते. नागरिकांनी कोरोनाबाबत सतर्कता बाळगावी. कोणताही आजार जाणवल्यास जवळच्या हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घ्यावी व विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. मास्क व सॅनिटायझरचा वापर नेहमी करा, असे मार्गदर्शन डॉ. संजय डुमगोळ यांनी यावेळी केले.
साहित्य वितरणप्रसंगी सागर संताजी, किरणकुमार पाटील, महेश कामाण्णाचे, दीपक चौगुले, मोहन संताजी, राजू चौगुले, उमेश घोरपडे, सतीश बडवाण्णाचे, मंजुनाथ दनदमनी, सूरज संताजी, सूरज मोरे, केतन संताजी, संभाजी संताजी आदी उपस्थित होते. तरुणांनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.









