विश्व हिंदू परिषदेची मागणी : शहरात काढला भव्य मोर्चा, चन्नम्मा चौकात निदर्शने करून श्रद्धांजली, जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव
शिमोगा येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची धर्मांध शक्तींनी निर्घृण हत्या केली आहे. त्यांच्या मारेकऱयांना त्वरित अटक करावी, तसेच देश विघातक कृत्य करणाऱया संघटनांवर कारवाई करावी, अशी मागणी करत बुधवारी विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाने भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
बजरंग दलाच्यावतीने कन्नड साहित्य भवन येथून भव्य मोर्चा काढण्यात आला. चन्नम्मा चौकात निदर्शने करून हर्ष यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले.
मागील काही दिवसांत कर्नाटकात हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. सरकारकडून मारेकऱयांना पकडण्याचे पोकळ आश्वासन दिले जाते. असे प्रकार बंद करून या प्रकरणाचा सखोल तपास करत मारेकऱयांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अन्यथा भाजपला भोगावे लागणार परिणाम
कर्नाटकात भाजप सरकार सत्तेत असतानाही हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. हर्ष यांच्या मारेकऱयांवर कठोर कारवाई न केल्यास पुढील निवडणुकीत भाजप सरकारलाही याचे परिणाम भोगावे लागतील. राज्यातील स्थिती स्फोटक बनत चालली असून याचा काँग्रेस अथवा भाजप यांनी राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नये, असा इशारा जिल्हा संयोजक भावकाण्णा लोहार यांनी दिला.
कर्नाटकात मोठय़ा प्रमाणात हिंदू आहेत. परंतु धर्मांध शक्तींकडून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. हा देश आमचा आहे. या ठिकाणी दुसरा पाकिस्तान वसविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, एसडीपीआय व पीएफआय या दोन संघटनांवर कायमची बंदी आणावी, असे मोर्चावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदन स्वीकारत ते मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पाठवून देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी रुद्रकेसरी मठाचे हरिगुरु महाराज, नागनाथ मठाचे नागनाथ स्वामीजी, बसवराज भागोजी, कृष्णा भट, श्रीकांत कदम, हेमंत हावळ, विजय जाधव यांसह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या घोषणा अन्पो लिसांचा चोख बंदोबस्त!
कर्नाटकातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या स्फोटक वातावरण तयार झाले आहे. बुधवारी बेळगावमध्ये मोर्चा काढण्यात येणार होता. त्यामुळे शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकीकडे विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. तर दुसरीकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांची धडपड सुरू होती.









