वार्ताहर/ हर्णै
जिह्यातील मोठे मासळी खरेदी-विक्री केंद्र असलेल्या हर्णे बंदरातील मासळी लिलाव प्रक्रिया आता रोखीने सुरू करण्यात आली आहे. येथील मच्छीचा भाव किलोच्या हिशोबाने होणार असल्याने येथील मच्छीमारांसह मच्छीमार संस्थांचेही अर्थकारण बदलणार आहे. त्यातच लिलावाची वेळ सकाळी 8.30 ऐवजी 8 तर सायंकाळी साडेचारऐवजी 4 व्अशी बदलण्यात आली आहे.
हर्णे बंदर ताज्या मासळीसाठी आणि खुल्या लिलाव पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे कोणीही येऊन लिलावात मासळी खरेदी करू शकते. येथे सकाळ व संध्याकाळ मच्छी लिलाव चालतात. हर्णे बंदरात सध्या स्थानिक व्यापारी मोठय़ाप्रमाणात ही मासळी खरेदी करून पुणे, मुंबई, गोवा, मेंगलोर, कोचीन आदी ठिकाणी पाठवितात. या व्यवहारात उधारीचे प्रमाण वाढत चालल्याने याचा परिणाम मच्छीमारांच्या अर्थकारणावर होत होता. मासळीचे पैसे रोख मिळत नसल्यामुळे मच्छीमारांनाही डिझेल, बर्फ, रेशन आदी उधारीवर खरेदी करावे लागत होते.
मच्छीमाराना मच्छीमार संस्थांमार्फत उधारीवर डिझेल पुरवठा केला जात आहे. मात्र डिझेलच्या किमती खूपच वाढल्याने डिझेल खरेदीसाठी मोठी रक्कम उभारण्याबातही पेच निर्माण होत होता. यामुळे मच्छीमारांची कोंडी झाली होती. हरणाई बंदर समितीही यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करीत होती. मच्छीमाराला जगवायचं असेल तर लिलाव रोखीत करण्यावर एकमत झाल्याने हरणाई बंदरातील व्यवहार रोखीत करण्यास सुरूवात झाली आहे. येथील मासळीचा लिलाव किलोच्या दराने होणार आहे. यामध्ये मोठय़ा रकमेसाठी 60 टक्के रोख व उरलेली रक्कम 8 दिवसांत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची सुरूवात हरणाई बंदरात त्वरित झाली असून याबाबत मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले आहे. ही पध्दत कायमस्वरूपी टिकणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले आहे.
मासळी लिलावाची वेळ बदलली!
हर्णे बंदरात सकाळी आणि संध्याकाळी असे दोनवेळा मच्छी लिलाव होतात. पूर्वी या लिलावाची वेळ सकाळी साडेआठ व सायंकाळी साडेचारची होती. त्यामध्ये बदल करण्यात आला असून आता लिलाव सकाळी 8 व सायंकाळी 4 वाजता सुरू होणार आहेत.