प्रतिनिधी/ दापोली
पंधरा दिवसांपूर्वी मुंबई येथील रेडझोनमधून हर्णे येथे दाखल झालेल्या व आपण नौदलात अधिकारी असल्याचे खोटे सांगणाऱया संभूल नामक युवकाने हर्णे गाव व सरपंचांची माध्यमांमध्ये व सोशल मिडियावर बदनामी केली आहे. या प्रकरणी सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे पंचायत समितीचे सभापती रऊफ हजवानी यांनी हर्णे ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, हा युवक हर्णे येथे कोणतीही पूर्वसूचना न देता आला होता. तो एका व्यापारी बोटीवर मुख्य आचारी म्हणून काम करत होता. ही बातमी आरोग्य व महसूल विभागाला समजली. त्यावेळी महसूल व आरोग्य विभाग यांनी नियमानुसार कारवाई केली. मात्र त्याला रात्री तत्काळ घरी पाठवण्यात आले. यासंदर्भात गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सकाळी ताबडतोब बैठक घेऊन त्या युवकाला नियमानुसार क्वारन्टाईन करावे, अशी मागणी प्रांतांकडे केली. यानंतर हा युवक संस्थात्मक क्वारंटाईन झाल्यानंतर आपण सभापती म्हणून त्याला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. तरीही या युवकाने गावचे सरपंच व हर्णे गावाची बदनामी केली.
सरपंच मुनिरा शिरगावकर म्हणाल्या की, आम्ही त्यावेळी जे काही केले ते सर्व शासनाच्या आदेशाच्या अधीन राहूनच केले आहे. ज्यावेळी हा युवक गावात आला त्यावेळी आपण स्वतः पोलीस पाटील, आरोग्यसेविका व एक सदस्य असे त्या युवकाच्या घरी गेलो होतो. संपूर्ण गाव गेलेला नव्हता. यानंतर त्या युवकाला रुग्णवाहिकेतून दापोलीमध्ये पाठवले. कारण तसा उपविभागीय अधिकाऱयांचा आदेश होता. हसनमिया साखरकर म्हणाले, हा युवक गावात आला याची आपल्याला कल्पना नव्हती. महसूल अधिकाऱयांचा जेव्हा फोन आला तेव्हा तो आल्याचे आपल्याला कळले. आम्ही प्रशासनाला बोलावले नाही तर प्रशासनाने आपणहून आम्हाला फोन करून हा युवक गावांमध्ये आलेला आहे का, अशी विचारणा केली होती. व्यापारी सुनील आंबुर्ले म्हणाले की, या युवकाने वाडी व मोहल्ल्यामध्ये प्रवेश केला तेव्हा वाडीचे अध्यक्ष किंवा सरपंच यांना कल्पना देणे गरजेचे होते. तशी पूर्वकल्पना दिली असती तर आज गावाची बदनामी झाली नसती, असेही ते म्हणाले.









