हरिशंकर परसाई हे गेल्या शतकातले गाजलेले हिंदी लेखक आणि पत्रकार. 1924 साली होशंगाबाद (मध्य प्रदेश) येथे त्यांचा जन्म झाला. आज, म्हणजे 10 ऑगस्ट रोजी, त्यांच्या निधनाला पंचवीस वर्षे झाली. त्यांचे एक अवतरण आठवले.हिंदीत असले तरी भाषा इतकी सोपी आहे की भाषांतर करण्याची गरज नाही.
अब करना यह चाहिए। रोज विधानसभा के बाहर एक बोर्ड पर ‘आज का बाजार भाव’ लिखा रहे। साथही उन विधायकों की सूची चिपकी रहे जो बिकने को तैयार हैं। इससे खरीददार को भी सुविधा होगी और माल को भी।
परसाईजी मध्य प्रदेशातले होते म्हणून त्यांनी तसे लिहिले असेल. ते पुण्यातले असते तर त्यांनी काही वेगळे लिहिले असते. पुणेरी पाटय़ा त्यांच्या लेखनातून झळकल्या असत्या. ते पुणेरी असल्याची कल्पना केली तरी त्या पाटय़ा डोळय़ांसमोर येतात.
आमचे येथे सर्व पक्षातले घोडे मिळतील. घोडय़ांना सुरक्षित ठेवण्यासाठी माफक दरात रिसॉर्टची सोय उपलब्ध. पहाटे शपथविधीपुरते हजर राहण्यासाठी वेगळे दर पडतील. पक्षांतर न करता फक्त अविश्वास ठरावाच्या वेळी गैरहजर राहण्यासाठी खास सवलतीचे दर. एकदा विकलेला घोडा परत घेतला जाणार नाही. सरकारी अधिकारी, पोलीस वगैरेंशी मारामारी करणाऱया घोडय़ांसाठी जादा चार्ज लावला जाईल.
परसाईंची एक लघुकथा मजेदार आहे.
एका राज्यात भ्रष्टाचारी मंत्र्याविरुद्ध लोकमत प्रक्षुब्ध झाले होते. विरोधकांनी मंत्र्याचा पुतळा जाळायचे ठरवले. एक भव्य, पन्नास फुटी लाकडी पुतळा तयार केला. जाळण्याची तारीख वर्तमानपत्रात छापून आली. ज्यांचा पुतळा जाळला जाणार होता ते मंत्री भडकले. त्यांनी पोलिसांना सूचना दिल्या. पोलिसांनी राज्यात सर्वत्र जमावबंदीचा आदेश लागू केला. पुतळा जप्त केला. विरोधकांना अटक केली आणि सर्वांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. कूर्मगतीने खटले अनेक वर्षे चालू राहतील. निवडणुकीच्या वेळी सरकारला विरोधकांवर देशद्रोहाचा आरोप करणे आणि निवडणूक जिंकणे सोपे जाईल. पण त्या पन्नास फुटी पुतळय़ाची पोलीस कार्यालयात अडचण होऊ लागली. किती दिवस सांभाळणार. शेवटी एक दिवस पोलिसांनीच तो पुतळा जाळून टाकला.
पोलिसांवर कोणी देशद्रोहाचा आरोप केला नाही.








