वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तरप्रदेशमधील झांशी येथे झालेल्या हॉकी इंडियाच्या 2023 च्या पहिल्या उपकनिष्ठांच्या पुरुष आणि महिला उत्तर विभागीय हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाने दुहेरी मुकुट साधला. हरियाणाच्या पुरुष आणि महिला संघानी या स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले.

उपकनिष्ठ महिलांच्या अंतिम सामन्यात हरियाणाने उत्तरप्रदेशचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. हरियाणातर्फे एकमेव निर्णायक गोल 5 व्या मिनिटाला सीमाने नोंदविला. महिलांच्या विभागात उत्तरप्रदेशने उपविजेतेपद तर पंजाबने तिसरे स्थान मिळविले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात पंजाबने हिमाचल प्रदेशचा 8-0 असा पराभव केला. रविवारी झालेल्या उपकनिष्ठ पुरुषांच्या अंतिम सामन्यात हरियाणाने उत्तरप्रदेशचा 1-0 असा पराभव करत जेतेपद मिळविले. हरियाणातर्फे एकमेव निर्णायक गोल सचिनने पेनल्टी कॉर्नवर 58 व्या मिनिटाला नोंदविला. पुरुषांच्या विभागात पंजाबने चंदीगडचा 7-0 असा पराभव करत तिसरे स्थान मिळविले.









