वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात कर्णधार विकास कंडोलाने केलेल्या चमकदार प्रदर्शनामुळे हरियाणा स्टीलर्सने गुजरात जायंट्सवर केवळ दोन गुणांनी रोमांचक विजय मिळविला तर दुसऱया सामन्यात बेंगळूर बुल्सने पुणेरी पलटनवर मोठा विजय मिळविला.
हरियाणा स्टीलर्सने पूर्वार्धात पलटनवर मोठी आघाडी घेतली होती. पण जायंट्सने पुन्हा पकड मिळविली आणि शेवटच्या काही मिनिटांत स्टीलर्सवर आघाडीही घेतली. पण स्टीलर्सने संयम राखत शानदार प्रदर्शन केले आणि 38-36 असा केवळ दोन गुणांनी रोमांचक विजय मिळविला. दिवसातील दुसऱया सामन्यात बेंगळूर बुल्सने पुणेरी पलटनचा 40-29 असा मोठा पराभव केला. त्यांच्या विजयात पवन सेहरावत स्टार ठरला. त्याने 11 रेडपॉईंट मिळविले, त्यातील 10 त्याने उत्तरार्धात मिळविले. त्याच्या या कामगिरीमुळेच बेकमधील सहा गुणांची पिछाडी भरून काढण्यात बेंगळूरला यश आले. पलटनने सामन्याची जबरदस्त सुरुवात केली होती. पण बुल्सच्या अनुभवी आक्रमणासमोर त्यांचा समतोल ढळल्याचे दिसून आले. पहिल्या सामन्यात विकास कंडोला हरियाणासाठी स्टार ठरला. त्याने 11 रेडपॉईंट मिळविले.
हरियाणाविरुद्धच्या सामन्यात गुजरात जायंट्सनेच प्रथम आघाडी घेतली. पण कंडोलाने दोनदा रेडपॉईंट मिळवित आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. दहाव्या मिनिटाला हरियाणा स्टीलर्सने गुजरातला ऑलआऊट करीत 9-5 अशी चार गुणांची आघाडी मिळविली. काही क्षणानंतर हरियाणाने उत्तम पकड करीत 12-5 अशी सात गुणाने आघाडी वाढविली. 12 व्या मिनिटाला मीतूने उत्कृष्ट चढाई करीत हरियाणाची आघाडी आणखी वाढविली आणि 14 व्या मिनिटाला स्टीलर्सने गुजरातला आणखी एकदा ऑलआऊट करीत 18-6 अशी मोठी बढत मिळविली. पूर्वार्ध संपण्यास काही मिनिटे असताना कंडोलाने चढाईचे गुण मिळविले. मध्यंतराला स्टीलर्सने 22-10 अशी बढत मिळविली होती.
उत्तरार्धात गुजरात जायंट्सने सुधारित खेळ करीत झटपट गुण मिळविले. पण स्टीलर्सने सुपर टॅकल केल्याने त्यांची आघाडी 24-14 अशी झाली. 28 व्या मिनिटाला जायंट्सने स्टीलर्सला ऑलआऊट करीत स्टीलर्सची आघाडी कमी केली. मात्र स्टीलर्सने गुण मिळविण्याचा सिलसिला चालू ठेवला. 32 व्या मिनिटाला मीतूने उत्कृष्ट चढाई केल्यानंतर 30-25 अशी बढत मिळाली. पण नंतर 37 व्या मिनिटाला जायंट्सने स्टीलर्सला ऑलआऊट करीत 32-31 अशी आघाडीही घेतली. 39 व्या मिनिटाला मीतूने हरियाणासाठी सुपर रेड टाकत आव्हान जिवंत ठेवताना 35-35 अशी बरोबरी साधून दिली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला स्टीलर्सने सुपर टॅकल करीत 36-35 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर अखेरच्या काही सेकंदात कंडोलाने दोन सुपर रेड टाकत आपल्या संघाला 38-36 असा थरारक विजय मिळवून दिला.
बेंगळूर बुल्सचा उत्तरार्धात जोर

दुसऱया सामन्यात पुणेरी पलटनने जोरदार सुरुवात केली. युवा रायडर्स मोहित गोयत व अस्लम इनामदार यांना बेंगळूरच्या बचावातील त्रुटीचा लाभ घेतला. बेंगळूरला मात्र गुण मिळविण्यासाठी झगडावे लागत होते. त्यांचे अव्वल रायडर्स पवन सेहरावत व चंदन रणजीत सुस्तावलेले दिसले. पुणेच्या बचावफळीतील अनुभवी बलदेव व विशाल भारद्धाज यांनी बेंगळूरला सहज गुण मिळणार नाहीत, याची दक्षता घेतली. पुणेने 15 व्या मिनिटाला बेंगळूरला ऑलआऊट करीत पाच गुणांची आघाडी घेतली. युवा रायडर भरतच्या मार्फत बुल्सने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण मध्यंतराला पुणेरी पलटनने 18-13 अशी आघाडी घेतली.
ब्रेकनंतर मात्र पवन सेहरावतने बुल्सच्या आक्रमणाची धुरा सांभाळताना अनेक रेड पॉईंट्स मिळविले आणि नवव्या मिनिटाला त्यांनी पुणेला ऑलआऊटही केले. इथून पुढे त्यांना गती मिळाली आणि पुणेचे युवा खेळाडू गोंधळून गेले. बुल्सने सहा मिनिटे असताना पलटनला दुसऱयांदा ऑलआऊट करीत तब्बल 12 गुणांची आघाडी घेतली. पवनने आणखी एकदा सुपर टेन साधले. त्याला रोखणे पलटनला कठीण जात असल्याचे दिसून आले. अनुभवी बुल्सच्या खेळाडूंनी नंतर आघाडी राखण्याचे काम करीत सामना जिंकला. पुणेला या सत्रात फक्त 11 गुण मिळविता आले.









