ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हरियाणा सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले होते. आता कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. यासोबतच रुग्ण बरे होण्याच्या दरात देखील वाढ होताना दिसत आहे. तसेच राज्यात लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. असे असले तरी सरकारने पुन्हा एकदा 14 जूनच्या पहाटे 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे.

दरम्यान, सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अनेक निर्बंधात सूट देखील देण्यात आली आहे. यामध्ये दुकाने, मॉल, रेस्टॉरंट, बार आणि धार्मिक स्थळे सुरू करण्यात परवानगी दिली आहे. मात्र, या दरम्यान, अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रदेशातील दुकाने आता सम – विषम योजनेनुसार, सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू असणार आहेत. तर क्लब हाऊस, हॉटेल्स आणि गोल्फ क्लब मधील बार 50 % क्षमतेसह सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. यासोबतच लग्न समारंभ, अंतिम संस्कार आणि श्राद्ध कार्यासाठी जास्तीत जास्त 50 नागरिकांना सहभाग घेता येणार आहे. 50 पेक्षा अधिक नागरिकांना सहभाग घेण्यासाठी डेप्युटी कमिश्नरची परवानगी घ्यावी लागणार आहे.
यासह सरकारने खाजगी ऑफिसमध्ये 50 % क्षमतेने कर्मचाऱ्यांना काम करण्यास परवानगी दिली आहे. तर धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, एकावेळी मंदिरात केवळ 21 नागरिकांनाच प्रवेश मिळणार आहे. तर हॉटेलमधील पार्सल सेवा रात्री 10 पर्यंत सुरू असणार आहे.









