ऑनलाईन टीम / चंदीगढ
हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात डाडम खाण क्षेत्रातील डोंगराचा भाग खचल्याने मोठी दुर्घटना 1 जानेवारी रोजी घडली आहे. ही दुर्घटना डोंगर कोसळल्यामुळे दरडीखाली दबून वीस जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. शोध कार्य सुरु असुन मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या ढिगाऱ्यांखाली जवळपास 10 गाडय़ा आणि 25 जण जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शुक्रवार 31 डिसेंबर 2021 रोजी सुरु असणाऱ्या खाणकामादरम्यानच ही दुर्घटना घडली होती.
भिवानीतील तोशाम परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगर खाणकाम सुरू आहे. प्रदूषणामुळे दोन महिन्यांपूर्वी खाणकाम बंद करण्यात आले होते. एनजीटीने गुरुवारी खाणकाम पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. यानंतर शुक्रवारपासून खाणकामाला सुरुवात झाली. दोन महिन्यांपासून खाणकाम बंद असल्याने परिसरात बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला होता. या टंचाईवर मात करण्यासाठी येथे मोठा स्फोट करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कृषिमंत्री जे. पी. दलाल यांनी घटनास्थळी दाखल होत घेतला आढावा
या दुर्घटनेची माहिती मिळताच कृषिमंत्री जे. पी. दलाल यांनी घटनास्थळी दाखल होऊन आढावा घेतला. त्यावेळी ते म्हणाले, डोंगर कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली दबून दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी 15 ते 20 लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती आहे. घटनास्थळी बचावकार्याला वेग आला आहे. डॉक्टरांची एक टीमही या ठिकाणी दाखल आहे. काही लोकांना वाचविण्यात यश आले असून, जखमींना हिसार येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खाणीत वापरण्यात येणाऱ्या पोकलॅनसारख्या मशिनरींसह जवळपास 10 वाहनेही ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत.