ऑनलाईन टीम / चंदीगढ :
हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात डाडम खाण क्षेत्रातील डोंगराचा भाग खचल्याने मोठी दुर्घटना घडली. डोंगर कोसळल्यामुळे दरडीखाली दबून दोन जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. त्यांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली जवळपास 10 गाडय़ा आणि 15 ते 20 जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ मदतकार्याला सुरूवात केली आहे. घटनास्थळी प्रसारमाध्यमे आणि सामान्य नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच कृषिमंत्री जे. पी. दलाल यांनी घटनास्थळी दाखल होऊन आढावा घेतला. त्यावेळी ते म्हणाले, डोंगर कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली दबून दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी 15 ते 20 लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती आहे. घटनास्थळी बचावकार्याला वेग आला आहे. डॉक्टरांची एक टीमही या ठिकाणी दाखल आहे. काही लोकांना वाचविण्यात यश आले असून, जखमींना हिसार येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खाणीत वापरण्यात येणाऱ्या पोकलॅनसारख्या मशिनरींसह जवळपास 10 वाहनेही ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत.









