प्रथमश्रेणी क्रिकेटमधील अनुभवी तारा निखळला, क्रिकेट वर्तुळावर शोककळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील सर्वोत्तम व कमनशिबी क्रिकेटपटूंपैकी एक असणाऱया हरियाणाचे माजी डावखुरे फिरकीपटू राजिंदर गोएल यांचे रविवारी उत्तररात्री रोहटक येथील निवासस्थानी वृद्धापकालाने निधन झाले. निधनसमयी ते 77 वर्षांचे होते. रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक 637 बळींचा विक्रम त्यांच्या खात्यावर आहे. 1958 ते 1985 या कालावधीत ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा नितीन असा परिवार आहे. नितीन गोएलनी देखील प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले असून सध्या मॅच रेफ्री म्हणून ते कार्यरत आहेत.
1960-70 च्या दशकात भारतातील उत्तम फिरकी गोलंदाजांमध्ये राजिंदर गोएल यांचा सातत्याने समावेश होता. पण, त्या पर्वात भारतात बरेच सर्वोत्तम फिरकी गोलंदाज असल्याने गोएल यांना भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची एकही संधी मिळाली नाही. 1974 मध्ये ते संघात समाविष्ट होण्याच्या उंबरठय़ावर होते. विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांचा संभाव्य संघात समावेश होता. या लढतीसाठी त्यांनी नवे बूट, बॅट व पूर्ण किट खरेदी केले. पण, प्रत्यक्षात 11 सदस्यीय अंतिम संघात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यानंतर पुढील कसोटीत बेदी संघात परतले आणि गोएल यांच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे जणू कायमचेच बंद झाले.
गोएल यांच्याविरुद्ध मी कधीच सहजतेने फलंदाजी करु शकलो नाही, अशा भावना व्यक्त करत सुनील गावसकर यांनी गोएल यांचे मोठेपण शब्दबद्ध केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2017 मध्ये त्यांना सीके नायुडू आजीवन पुरस्कार देऊन गौरवले होते.
गोएल यांची बरीचशी कारकीर्द बिशन सिंग बेदी यांच्याभोवती केंद्रित राहिली. बिशन सिंग बेदी त्या काळचे सर्वोत्तम फिरकी गोलंदाज होते आणि या पार्श्वभूमीवर गोएल कधीच भारतीय संघात स्थान मिळवू शकले नाहीत.
गोएल यांनी पतियाळा, दक्षिण पंजाब, दिल्ली व हरियाणा या संघांचे प्रतिनिधीत्व करत प्रथमश्रेणी क्रिकेटमधील आपल्या प्रदीर्घ व यशस्वी कारकिर्दीत 750 बळी घेतले. राजिंदर गोएल यांचे वडील नरवाणा (त्यावेळचे पंजाब व आता हरियाणाचा भाग) येथे भारतीय रेल्वे खात्यात सहायक स्टेशन मास्टर पदावर कार्यरत होते. गोएल यांनी 1957 मध्ये उत्तर विभागीय शालेय संघाकडून आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली व पुढील हंगामात पतियाळातर्फे रणजी पदार्पण केले. पुढे 1963 मध्ये ते दिल्लीत आले आणि 10 वर्षांच्या अंतराने पुन्हा हरियाणात स्थायिक झाले.
1964-65 मध्ये अहमदाबाद येथे सिलोनविरुद्ध त्यांनी ‘अनधिकृत’ कसोटी खेळली. यातील दुसऱया डावात त्यांनी 4 बळी घेतले होते. गावसकर यांनी आपल्या आयडॉल्स या पुस्तकात गोएल यांचा समावेश केला आहे. ‘निवडकर्त्यांना गोएल यांना कधीच संधी द्यायची नव्हती. कारण, गोएलनी काही बळी घेतले असते तर बेदींचे पुनरागमन कठीण झाले असते’, असा दावा गावसकरांनी केला होता. कपिल हे हरियाणाचे सर्वात महान खेळाडू. पण, कपिलच्या पर्वापूर्वी जर हरियाणातील एखादा खेळाडू तितका चमकला असेल तर तो राजिंदर हाच होता. योगायोगाने कपिलच्या हरियाणा संघाने 1991 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबईविरुद्ध एका धावेने रोमांचक विजय मिळवला, त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष राजिंदर गोएल हेच होते.
विभिन्न दशकात एखाद्या पिता-पुत्राविरुद्ध गोलंदाजी
राजिंदर गोएल यांची प्रदीर्घ कारकीर्द हे त्यांचे वैशिष्टय़ ठरले. या प्रदीर्घ कारकिर्दीचे क्षितिज किती विस्तारले होते, हे त्यांनी मांजरेकर पिता-पुत्राविरुद्ध विभिन्न दशकात गोलंदाजी केली, त्यावरुनही दिसून येते. 1950-60 च्या दशकातील भारताचे सर्वोत्तम फलंदाज दिवंगत विजय मांजरेकर यांच्याविरुद्ध राजिंदर गोएल खेळले व आश्चर्य म्हणजे आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या हंगामात त्यांनी विजय मांजरेकरांचे चिरंजीव संजय मांजरेकरला देखील गोलंदाजी केली.
जी नही, बिशनसिंग बेदी बहोत बडे बॉलर थे!
राजिंदर गोएल यांना गोएल साब या टोपण नावाने विशेष ओळखले जायचे. बेदी अधिक सरस असल्याने राजिंदर यांना भारतीय संघात कधीच स्थान मिळाले नाही, ही वस्तुस्थिती सर्वश्रुत आहे. पण, स्वतः गोएल यांनी जाहीरपणे याची खंत कधीच व्यक्त केली नाही. बेदी यांच्या पर्वामुळे संधी मिळाली नाही, याची खंत वाटते का, असा प्रश्न एकदा विचारला गेला असता, त्यावर राजिंदर गोएल खुल्या दिलाने म्हणाले होते, ‘जी नही, बिशनसिंग बेदी बहोत बडे बॉलर थे’!
राजिंदर हे निष्णात फिरकीपटू होतेच. पण, त्यांचा दिलदार स्वभाव आणि कितीही प्रतिकूल स्थितीला हसतखेळत सामोरे जाण्याचा, ते स्वीकारण्याचा स्वभाव अधिक भावला. माझ्या मते त्यांनी जीव ओतून गोलंदाजी केली आणि खऱया अर्थाने रणजी चषक स्पर्धाच जिवंत केली.
-माजी फिरकीपटू बिशनसिंग बेदी
देशांतर्गत प्रथमश्रेणी क्रिकेटमधील महान तारा आज निखळला आहे. त्यांचे देदीप्यमान प्रदर्शन, आकडेवारीच त्यांची महानता विशद करते. 25 वर्षे खेळत राहणे, 750 बळी घेणे, ही कामगिरी निश्चितच कठीण स्वरुपाची आहे.
-बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली
फिरकी गोलंदाजीतील मास्टर म्हणजे राजिंदर गोएल. अचूक टप्प्यावरील नियंत्रित, भेदक गोलंदाजी आणि दिलदार स्वभाव ही त्यांची गुणवैशिष्टय़े स्मरणात राहतील. राजिंदरना श्रद्धांजली.
-भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री
राजिंदर यांच्या निधनाने आपण महान खेळाडू गमावला आहे. रणजी चषक स्पर्धेत घेतलेले सर्वाधिक बळी त्यांची महानता दर्शवतात. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत.
-भारतीय कर्णधार विराट कोहली
राजिंदर गोएल यांना मी गोलंदाजीतील ‘ब्रॅडमनेक्स’ मानतो. प्रथमश्रेणीतील 157 सामने, 750 बळी, 59 वेळा डावात 5 व त्यापेक्षा अधिक बळी, 18 वेळा सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा अधिक बळी, सरासरी 18.58 ही सारी आकडेवारी त्यांची असाधारण कर्तबगारीच दर्शवते.
-माजी क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर
राजिंदर गोएल
जन्म : 20 सप्टेंबर 1942 (नरवाणा, पंजाब, ब्रिटीश प्रांत. आता हरियाणा)
प्रथमश्रेणी पदार्पण : 23 डिसेंबर 1958 (पतियाळा वि. सेनादल)
शेवटचा प्रथमश्रेणी सामना : 9 मार्च 1985 (हरियाणा वि. बॉम्बे)
लिस्ट ए पदार्पण : 3 ऑक्टोबर 1974 (उत्तर विभाग वि. दक्षिण विभाग)
शेवटचा लिस्ट ए सामना : 13 मार्च 1985 (हरियाणा वि. बंगाल)
स्पर्धा / प्रथमश्रेणी / लिस्ट ए
सामने / 157 / 8
धावा / 1037/ 11
सर्वोच्च / 44/ 5*
टाकलेले चेंडू /39929/ 508
बळी / 750 / 14
गोलंदाजी सरासरी / 18.58/ 20.00
डावात 5 बळी / 59 / 0
डावात 10 बळी / 18 / –
सर्वोत्तम पृथक्करण / 8-55 / 4-54









