आज बेळगावमध्ये होणार दाखल : बेळगाव-तिरुपती प्रवास होणार सोयीचा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिरुपती-कोल्हापूर या मार्गावर धावणारी हरिप्रिया एक्स्प्रेस पुन्हा रूळावर येत आहे. सोमवार दि. 1 फेब्रुवारी रोजी तिरुपती येथून निघालेली हरिप्रिया एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी 12.21 वा. बेळगावमध्ये दाखल होणार आहे. यामुळे अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बेळगावच्या भाविकांना तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनाला जाता येणार आहे.
लॉकडाऊननंतर तब्बल दहा महिन्यांनी रेल्वे पूर्वपदावर येऊ लागली आहे. कोरोनानंतर काही मोजक्मयाच रेल्वे बेळगाव रेल्वेस्थानकावरून धावत होत्या. त्यामध्ये आता हळुहळू वाढ होत आहे. चन्नम्मा एक्स्प्रेस सुरू केल्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. या रेल्वेला नेहमीच चांगले बुकिंग असल्यामुळे ही रेल्वे सुरू झाल्यास उत्तम महसूल जमा होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव-मिरज प्रवास होणार सोयीचा
हरिप्रिया एक्स्प्रेस तिरुपती ते कोल्हापूर या मार्गावर धावते. यामुळे बेळगावमधून मिरजला जाणाऱया प्रवाशांनाही आणखी एक रेल्वे उपलब्ध होणार आहे. मिरजच्या दिशेने जाण्यासाठी दुपारच्या सत्रात सोय होणार आहे. दुपारी मिरजहून बेळगावला येण्यासाठीही या रेल्वेचा उपयोग होणार असल्याने हरिप्रिया एक्स्प्रेस पूर्ववत केल्याबद्दल प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.









