मुंबई येथून आलेल्या कुटुंबासह ड्रायव्हरही कोरोनाबाधित : गुजरातवरून आलेला अन्य चालक कोरानाबाधित
प्रतिनिधी / पणजी
कोरोनामुक्त क्लिन गोवा म्हणून जाहीर झालेला असताना बुधवारी अचानक सात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने राज्यात एकच खळबळ माजली. या सातपैकी पाच रुग्ण हे एकाच कुटुंबातील सांताप्रुज फोंडा येथील असून त्यांना मुंबईहून गोव्यात घेऊन येणारा ड्रायव्हर देखील कोरोनाबाधित असल्याने या सर्वांची सायंकाळी उशिरा दुसरी चाचणी घेण्यात आली आहे. त्याचा अहवाल अपेक्षित आहे. बेतोडा फोंडा येथे आणखी एक ड्रायव्हर बाधित सापडला असून सदर व्यक्ती दोन दिवसापूर्वीच आल्याच्या वृत्ताने आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींची अक्षरशः त्रेधा तिरपीट उडाली आहे.
महिनाभरात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नसल्याने संपूर्ण गोवा हे देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य जाहीर झाले होते. असे असताना या हरित विभागात बुधवारी मुंबईवरून आलेल्या चालकासह सहाजण आणि बेतोडा फोंडा येथे एक मिळून सात कोरोनाबाधित रुग्ण सापडले. यामुळे गोव्याला आता नव्याने सीमेवर कडक तपासणी करणे भाग पडले आहे.
पत्रादेवी चेकनाक्यावर सापडले सहाजण
पत्रादेवी येथे बुधवारी दुपारी गोव्याच्या सीमेवर एका गाडीची तपासणी करीत असताना संशय आल्याने गाडीतील ड्रायव्हरसह सहाजणांची तपासणी सुरू करण्यात आली. त्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये असे आढळून आले की, सर्व मंडळी एकाच कुटुंबातील असून ही मंडळी मुंबईहून सांताप्रुज फोंडा येथे येत होती. पाचहीजण हे फोंडा येथील आहेत. या पाचहीजणांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यांच्या चालकाची तपासणी केली असता तो देखील कोरानाबाधित रुग्ण असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना तपासणी व विलगीकरणासाठी पाठविण्यात आले.
तपासणीत कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट
पहिल्या तपासणीत ते सर्व कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यानंर सायंकाळी त्यांची दुसरी महत्वपूर्ण चाचणी घेण्यात आली असता या तपासणीचा अहवाल मध्यरात्री येणे अपेक्षित आहे.
फेंडय़ात अजून एक रुग्ण : एकच खळबळ
दरम्यान, गुजरातवरून मालगाडी घेऊन गोव्यात आलेल्या एका ड्रायव्हरला फेंडय़ात पोहोचला असता बेतोडय़ाच्या जवळपास महामार्गावर चक्कर आली. त्याने जवळपासच्या काही लोकांकडे पाण्याची मागणी केली. नागरिकांनी सावधपणे त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली व ते बाजूला सरले. त्यानंतर कोणीतरी तातडीने 108 रुग्णवाहिकेला बोलावून घेतले. 108 मधील कर्मचाऱयांनी सदर चालकाची तपासणी केली. फेंडय़ाच्या आयडी इस्पितळात रुग्णवाहिकेतून तपासणीसाठी नेले. तेथे त्याची कोरोना तपासणी करण्यात आली असता त्याचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे त्याला इस्पितळाच्या बाहेरच बसवून ठेवण्यात आले. सायंकाळी सदर रुग्णाची पूर्नतपासणी करण्यात आली असून तिचाही अहवाल रात्री उशिरा येण्याची अपेक्षा आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर व्यक्ती गुजरातहून काही जीवनावश्यक सामान घेऊन दोन दिवसांपूर्वीच गोव्यात आली होती. यामुळे एकच खळबळ माजली असून सदर व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात आलेली होती याची सविस्तर माहिती सदर व्यक्तीकडून गोळा करण्याचे काम सध्या गोवा पोलीस करीत आहेत.
अधिकाऱयांच्या कार्यतत्परतेमुळे हे सर्व उघडकीस : मुख्यमंत्री
सायंकाळी उशिरा दैनिक तरुण भारतशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली. जोपर्यंत सातही जणांचा दुसरा अहवाल सकारात्मक येत नाही तोपर्यंत हे कोरोनाबाधित रुग्ण असे अधिकृतपणे म्हणता येणार नाही. गोव्यात एकही कोविड 19 चा रुग्ण नाही. तथापि, जे कोणी रुग्ण आलेत ते सर्व परराज्यातून आलेले आहेत. सरकारी कर्मचारी तथा अधिकाऱयांच्या कार्यतत्परतेमुळेच हे उघडकीस आले. त्याबद्दल खरे म्हणजे आपण सरकारी अधिकाऱयांचे व तेथील कर्मचाऱयांचे आभार मानतो. हे सर्व सातही जण जनतेच्या संपर्कात आलेले नाहीत. तरीदेखील जर त्यांचा अहवाल सकारात्मक आला व ते बाधित असल्याचे कळाल्यास गोव्याला सध्या असलेला हरित दर्जा धोक्यात येऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









