प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात गुरुवारी हरितालिकेचे व्रत भक्तिभावाने आचरण्यात आले. गणेश चतुर्थीच्या आदले दिवशी म्हणजेच भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला हे व्रत केले जाते. या निमित्ताने बाजारात हरितालिकेच्या प्रतिमा दाखल झाल्या होत्या. महिलांनी त्या घरी आणून त्यांची यथासांग पूजा केली.
चौरंग मांडून त्यावर पिवळे वस्त्र घालून हरितालिकेच्या प्रतिमेबरोबरच कलश पूजाही करण्यात आली. विवाहेच्छुक तरुणी अनुरुप वर मिळावा यासाठी तर विवाहित महिला अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात. पार्वतीने शंकराशीच विवाह करण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी वनात जाऊन तिने तप केले. या ठिकाणी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा केली. याच कारणास्तव महिलांनी हरितालिकेबरोबरच मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग करून सोळा प्रकारची पत्री व बेल वाहून त्याची पूजा केली. दिवसभर उपवास करून संध्याकाळी देवीची आरती केली.









