प्रतिनिधी/महागाव
गडहिंग्लज – चंदगड राज्य महामार्गावर हरळी खुर्द येथील वैरागवाडी फाट्याच्या पुढील बाजूस भालेकर यांच्या घराजवळ बुधवारी रात्री ८:२० च्या दरम्यान आज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने प्रदीपकुमार सदाशिव पाटील (वय ३६, हरळी) या आरोग्य मित्राचा मृत्यू झाला आहे.
प्रदीपकुमार पाटील हे गडहिंग्लजला खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य मित्र म्हणून काम करत होते. आपल्या वैयक्तिक कामानिमित्त ते आपल्या दुचाकीवरून (MH09 CT 9442) महागावला गेले होते. आपले काम संपवून घरी येत असताना हरळी खुर्द येथील फाट्याच्या पुढील बाजूस भालेकर यांच्या घराजवळ अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याची वर्दी प्रमोद पाटील (रा. हरळी) यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली. या घटनेचा अधिक तपास कॉन्स्टेबल संभाजी जाधव करीत आहे. मयत प्रदीपच्या पश्चात आई,भाऊ असा परिवार आहे. सहा महिन्यापूर्वीच वडिलांचे निधन झाले होते.त्याच्या अपघाती निधनाने हरळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









