हायकमांडने चर्चेत आणलेली सर्व नावे बाजूला सारत आपल्याच शिष्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, याची व्यवस्था करून राजीनामा द्यावा लागल्याने पिछाडीवर पडलेल्या येडियुराप्पा यांनी आजही पक्षावर आपली पकड कायम आहे, हे विरोधकांना दाखवून दिले आहे.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना अखेर पायउतार क्हावे लागले. उर्वरित कार्यकाळ येडियुराप्पा यांनी पूर्ण करावा, यासाठी हायकमांडवर वेगवेगळय़ा मार्गातून दबाव आणण्यात आला. वेगवेगळय़ा जाती-धर्माचे मठाधीशही रस्त्यावर उतरले. तरीही त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात जड अंतःकरणाने त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. वारंवार आपल्याला कशी अग्नीपरीक्षा द्यावी लागली, याची उघडपणे वाच्यता करतानाच आनंदाने बाजूला होत असल्याचे जाहीर केले. ठरल्याप्रमाणे त्याचदिवशी दुपारी राज्यपालांकडे राजीनामा सोपविला. त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी कोण हा प्रश्न निर्माण झाला. या आधीपासूनच घडामोडी सुरू होत्या. सर्व अंदाज फोल ठरवत बसवराज सोमप्पा बोम्माई ऊर्फ बी. एस. बोम्माई यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
गेल्या एक-दोन महिन्यांपासून कर्नाटकातील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या होत्या. माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ हे तर एकापाठोपाठ एक तारखा जाहीर करीत होते. ‘बघा तर बघा येडियुराप्पा यांना बाजूला व्हावेच लागणार’ असे सुरुवातीपासून ते सांगत होते. खाण मंत्री मुरगेश निराणी, आमदार अरविंद बेल्लद, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी शेवटपर्यंत चर्चेत होती. ऐनवेळी आश्चर्यकारक नाव पुढे येणार, अशी अटकळ होती. मंगळवारी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत हायकमांडकडून आश्चर्यकारक नाव समोर येणार, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता. आता येडियुराप्पा संपले, त्यांचे विरोधक भक्कम होणार, अशीही चर्चा रंगली होती. मात्र, हायकमांडने चर्चेत आणलेली सर्व नावे बाजूला सारत आपल्याच शिष्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, याची व्यवस्था करून राजीनामा द्यावा लागल्याने पिछाडीवर पडलेल्या येडियुराप्पा यांनी आजही पक्षावर आपली पकड कायम आहे, हे विरोधकांना दाखवून दिले आहे. हायकमांडने राजीनाम्यानंतर एखाद्या राज्याचे राज्यपालपद देण्याची तयारी दर्शविली होती. आपण राज्यपाल होणार नाही, सक्रिय राजकारणात राहणारच असे त्यांनी ठासून सांगितले. तेव्हाच हायकमांडच्या अडचणी वाढल्या.
पुढच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना आर्थिक रसद पुरविण्याच्या दृष्टीने साखरसम्राट मुरगेश निराणी यांच्या नावाला हायकमांडची पहिली पसंती होती. नवा चेहरा म्हणून अरविंद बेल्लद, अनुभवी नेतृत्व म्हणून प्रल्हाद जोशी ही नावे ठळक चर्चेत होती. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांचे नावही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मंगळवारी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. त्याच्या आदल्या दिवशी मुरगेश निराणी दिल्लीत होते. आपल्या पक्षाच्या वरि÷ांची भेट घेऊन आपली खुंटी मजबूत करण्याच्या प्रयत्नात होते. बसवराज बोम्माई हे नावही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असले तरी त्यांनी हायकमांडकडे लॉबी केली नाही. उलट उर्वरित कार्यकाळासाठी येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री असतील, यासाठी त्यांची धडपड सुरू होती. माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्माई यांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारणाचे धडे लहानपणापासून आपल्या वडिलांकडून गिरविले आहेत. येडियुराप्पांवरील नि÷ा फळाला आली. त्यांनीच त्यांचे नाव सुचविले. या नावाला होकार द्यावा लागला. कारण, सद्गदित होऊन राजीनाम्याची घोषणा करणाऱया येडियुराप्पा यांच्यामुळे लिंगायत समाज भाजपपासून दूर जाऊ नये, याची काळजी घेण्यासाठीच बसवराज बोम्माई यांच्या निवडीवर हायकमांडला शिक्कामोर्तब करावा लागला.
वेगवेगळय़ा राज्यात भाजपने वेगवेगळे राजकीय प्रयोग राबविले. प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी अनेक ठिकाणी आश्चर्यकारक उमेदवार पुढे करण्यात आले. कर्नाटकाच्या राजकीय प्रयोगशाळेतही धक्कातंत्र देण्याचा हायकमांडचा प्रयत्न होता. कोणत्याही परिस्थितीवर चाणाक्षपणे मात करून ती हाताळण्याची कसोटी बसवराज बोम्माई यांना अवगत आहे. जर हायकमांडने ठरवलेल्या नावाची घोषणा झाली असती तर संसदीय पक्ष बैठकीत मतदानाची मागणी करण्याची व्यूहरचना करण्यात आली होती. ही गोष्ट लक्षात आल्यानेच बसवराज बोम्माई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागले. अरुण सिंग, धर्मेंद्र प्रधान, किशन रेड्डी या पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. बुधवारी नूतन मुख्यमंत्र्यांनी शपथही घेतली. आता मंत्रिमंडळ विस्ताराचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. येडियुराप्पा मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांना वगळण्यात येणार आहे. अनेक नव्या चेहऱयांना संधी मिळणार आहे. नेतृत्वबदलामुळे येडियुराप्पा विरोधकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी त्यांनी ठरविलेल्या उमेदवाराला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, याची सल त्यांच्या मनात आहेच. त्यामुळे पुढची दोन वर्षे कटकटीचीच जाणार, याची लक्षणे दिसू लागली आहेत.
येडियुराप्पा यांना बाजूला सारून प्रल्हाद जोशी यांना मुख्यमंत्रीपद देणार, ही अटकळ लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्यापासून दूर झालेला लिंगायत समाज जवळ करण्यासाठी फासे फेकले होते. या व्यूहरचनेचाच एक भाग म्हणून येडियुराप्पा यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे, अशी काँग्रेस नेत्यांची ओरड सुरू आहे. जर ठरल्याप्रमाणे प्रल्हाद जोशी मुख्यमंत्री झाले असते तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री एम. बी. पाटील यांची नियुक्ती करण्याचा विचार काँग्रेसने केला होता. येडियुराप्पा यांच्या भावूक निरोपाने लिंगायत मठाधीशांच्या मनात नाराजी निर्माण झाली होती. पक्ष कोणताही असो, लिंगायत नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करण्यास दिले जात नाही, ही त्यांची खंत होती. भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मठाधीशांनी उघडपणे दिला होता. मठाधीश राजकारणात उतरणे, एखाद्या राष्ट्रीय पक्षाला नेतृत्वबदलाच्या मुद्दय़ावरून धमकावणे, हे योग्य की अयोग्य हा चर्चेचा मुद्दा असला तरी येडियुराप्पा यांच्या पायउतार होण्यामुळे होणाऱया ‘डॅमेज कंट्रोल’साठी हायकमांडने बसवराज बोम्माई यांची निवड केली आहे. यापूर्वी गृह, कायदा व संसदीय, पाटबंधारेमंत्री म्हणून त्यांनी समर्थपणे आपली जबाबदारी निभावली आहे. पाणी योजनांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यामुळे ‘पाणी कुठे मुरत असेल’ त्याचा बंदोबस्त कसा करावा, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे.








