नायजेरियन संशयिताला अटक, एलएसडी, गांजा जप्त
प्रतिनिधी/ पणजी
अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या (एएनसी) पोलिसांनी हरमल येथे केलेल्या कारवाईत 12 लाख रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात एका नायजेरियन संशयिताला अटक केली आहे. संशंयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून त्याला आज बुधवारी रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव शेडलॉक लुईस कामा (32 वर्षे) असे आहे. तो मूळ नायजेरियन असून गेल्या काही वर्षापासून गोव्यात भाडय़ाच्या खोलीत राहत होता. संशयित ड्रग्जची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मात्र तो रंगेहाथ पोलिसांना सापडत नव्हता. 2017 सालापासून पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान तीन वर्षाचा काळ उलटला तरी पोलीस संशयिताच्या मागावरच होते.
एएनसी पोलिसांना मिळाली होती माहिती
शेडलॉक हा 15 डिसेंबर रोजी दुपारी गिरकरवाडा येथील एका व्हिलामध्ये येणार असल्याची माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. अगोदरच पोलिसांच्या नजरेत असलेली व्यक्ती व्हिलामध्ये येणार म्हणजे नक्कीच काहीतरी प्रकरणा असणार असे ठरवून एएनसी निरीक्षक सिताकांत नायक, उपनिरीक्षक प्रियांका सावंत व त्यांच्या टीमने ठरलेल्या ठिकाणी सापळा रचला.
काल मंगळवारी दुपारी 12.40 ते 15.40 दरम्यान कारवाई करून ड्रग्सचा व्यवहार करीत असतानाच संशयिताला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 11.806 ग्राम एलएसडी व 52.6 ग्राम गांजा जप्त केला आहे. बाजारभावा प्रमाणे त्याची किमंत 12 लाख रुपये होत आहे. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









