तमिळ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार भज्जी
क्रिकेटनंतर हरभजन सिंग आता चित्रपटसृष्टीत दिसून येणार आहे. हरभजनचा पहिला तमिळ चित्रपट ‘प्रेंडशिप’चा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. हरभजनने समाजमाध्यमांवर या चित्रपटाचा टीजर तमिळ, तेलगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रसारित केला आहे. रोमांटिक-स्पोर्ट्सची पार्श्वभूमी असलेल्या ‘प्रेंडशिप’ चित्रपटातून हरभजन तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
भज्जीचा हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदीत प्रदर्शित होणार आहे. टीजर समोर आल्यावर हरभजनचे चाहते, कुटुंबीय, मित्र, बॉलिवूडमधील कलाकार तसेच क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेश रैना आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही टीजर शेअर करत हरभजन यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
प्रेंडशिपमध्ये हरभजन महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या व्यक्तिरेखेत दिसून येईल. त्याच्या या चित्रपटात ऍक्शन, रोमांस, नृत्य, महाविद्यालयीन जीवन आणि क्रिकेटही पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन पॉल राज आणि श्याम सूर्या यांनी केले आहे. चित्रपटात हरभजन यांच्यासह प्रख्यात अभिनेते अर्जुन, तमिळ बिग बॉस फेम लोसलिया मारियानेसन आणि सतीश हे देखील दिसून येणार आहेत.









