कित्तूर राखीव जंगलात वनविभागाची कारवाई, बंदुक, 28 काडतुसे जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
गोल्याळी विभागातील कित्तूर राखीव जंगलात हरणाची शिकार करण्यासाठी गेलेल्या दोघा जणांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. आणखी दोघे जण फरारी झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. वनविभागाच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
अटक करण्यात आलेल्या दोघा जणांकडून डबल बॅरल बंदूक, 28 जीवंत काडतुसे, दोन हेड टॉर्च, एक चाकू, वॉकीटॉकी, चार बॉक्स एअरगनच्या गोळय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. स्वीफ्ट डिझायर कारमधून शिकारीसाठी हे चौघे जण राखीव जंगलात शिरले होते.
विभागीय वनाधिकारी श्रीनाथ कडोलकर यांनी या संबंधी माहिती दिली आहे. उद्धव राजेंद्र नायक (रा. विनायकनगर), सागर यल्लोजी पिंगट (रा. काकती) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्यावर वन्यजीवी कायदा 1972 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
महम्मदअली खान (रा. नेहरुनगर), अताउल्ला शिगीहळ्ळी (रा. कित्तूर) हे फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सीसीएफ बी. व्ही. पाटील, डीसीएफ एम. व्ही. अमरनाथ, एसीएफ सी. जे. मिरजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सिद्धलिंगेश्वर मगदूम, अजिज मुल्ला, प्रवीण धुळाप्पगोळ, गिरीश मेक्केद, राजू हुब्बळी आदींनी भाग घेतला.
हरणावर झाडली गोळी
वनविभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार स्वीप्ट कारमधून आलेले चौघे कित्तूर परिसरातील राखीव जंगलात शिरले होते. त्यांनी डबल बॅरल बंदुकीतून हरणावर गोळी झाडली. मात्र गोळीबारानंतर हरीण शिकाऱयांच्या तावडीतून निसटली आहे.









