ऐतिहासिक म्हैसूर दसरा उत्सवाला प्रारंभ झाला आहे. कोरोना महामारीचा फैलाव आटोक्मयात असला तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांना यंदाही दसरा उत्सवात भाग घेता येणार नाही.

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांनी दसरोत्सवाचे उद्घाटन केले आहे. म्हैसूर राजवाडय़ात होणाऱया कार्यक्रमांनाही सर्वसामान्यांना यंदा प्रवेश नाही. कोरोना महामारीच्या संकटातून मानव जातीला वाचविण्यासाठी चामुंडेश्वरी देवीला साकडे घालण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवस कर्नाटक दौऱयावर आहेत. बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राष्ट्रपतींचे कर्नाटकात स्वागत केले आहे. चामराजनगर, म्हैसूर, शृंगेरी, मंगळूर येथील विविध कार्यक्रमात राष्ट्रपती भाग घेणार आहेत.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी अंधश्रद्धा झुगारून दसरोत्सवात चामराजनगरचा दौरा केला आहे. जे नेते चामराजनगरला भेट देतील, त्या नेत्यांना राजकीय वनवास भोगावा लागतो, अशी समज आहे. त्यामुळे अनेक नेते या जिल्हय़ाला जाणे टाळतात. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांनी अंधश्रद्धेला फाटा देत जिल्हय़ाचा दौरा केला होता. आता बसवराज बोम्माई यांनी चामराजनगरला बदनामीतून सावरण्यासाठी त्या जिल्हय़ाचा दौरा केला. या आठवडय़ात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या व सोनिया गांधी यांची नवी दिल्ली येथे भेट झाली आहे. कर्नाटकात पंजाबची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून सोनिया गांधी यांनी सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचे आमंत्रण दिले आहे. आपण जेथे आहे, तेथेच सुखी आहोत, राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नाही, असे सिद्धरामय्या यांनी प्रत्युत्तरादाखल सांगितले आहे.
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली आहे. देशभरातील चार हजारहून अधिक आयएएस व आयपीएस अधिकारी हे संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत. देशात किंवा कर्नाटकात लोकनियुक्त सरकार नावापुरते आहे. खऱया अर्थाने आरएसएसकडून सरकारवर नियंत्रण आहे. आता अधिकारशाहीवरही संघाची पकड आहे. कारण संघाने प्रशिक्षित केलेले चार हजारहून अधिक सनदी अधिकारी देशभरात कार्यरत आहेत. देशाची वाटचाल पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या दिशेने सुरू आहे. आपला अजेंडा राबविण्यासाठी संघ आपल्या विचारांच्या अधिकाऱयांचा पुरेपूर वापर करतो आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. यावरून कर्नाटकात सध्या वादंग माजला आहे. भाजप नेत्यांनी कुमारस्वामी यांच्याविरुद्ध आगपाखड सुरू केली आहे.
आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी आतापासूनच निजद नेत्यांनी व्यूहरचना सुरू केली आहे. यासाठी कार्यशाळाही सुरू आहेत. ‘मिशन 123’ च्या नावाने वेगवेगळय़ा स्तरातील नेते-कार्यकर्त्यांना आपल्या फार्महाऊसवर बोलावून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम निजद नेत्यांनी हाती घेतले आहे. या दरम्यान त्यांनी संघाविरुद्ध आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई असोत, ते स्वतंत्र नाहीत. ते संघाचे बाहुले आहेत, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे. कोणत्या आधारावर अशी टीका करता, अशी विचारणा करीत भाजप नेते त्यांच्यावर तुटून पडले. त्यावेळी लॉकडाऊनमध्ये वाचलेल्या पुस्तकातून ही माहिती मिळाली आहे. संघाबद्दल जे पुस्तकात लिहिले आहे, तेच आपण मांडले आहे. असे सांगतानाच आपल्यावर टीका करणाऱया भाजप नेत्यांवर उलटवार करताना ठिकठिकाणी राबविण्यात येणारे ‘ऑपरेशन कमळ’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पठडीतील कार्यक्रम नव्हे तर काय आहेत? याचे स्पष्टीकरण संघानेच देण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकातही मुख्यमंत्री ‘केशव कृपा’च्या सूचनेवरून काम करतात. लोकांनी केशव कृपाला मतदान केले नाही, हे सध्या शासन चालविणाऱयांनी ध्यानात ठेवावे, असा सल्लाही कुमारस्वामी यांनी दिला आहे.
भाजपबरोबर घरोबा करून सत्तास्थापन करणाऱया कुमारस्वामी यांनी संघाविरुद्ध टीका का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक मातृसंस्था आहे. भाजप हा त्याचा एक भाग आहे, असे भाजपनेते सांगतात. याची कल्पना असूनही कुमारस्वामी यांनी भाजपबरोबर मैत्री का केली? एकेकाळी त्यांच्याशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करणारे कुमारस्वामी आता संघावर का उलटले? हा संशोधनाचा विषय असला तरी यामागचा हेतू स्पष्ट आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुकीत आपली परिस्थिती सुधारायची आहे. निजद हा प्रादेशिक पक्ष आहे. कर्नाटकात सध्या तरी प्रादेशिक पक्षाच्या हाती सत्ता मिळेल, अशी स्थिती नाही. अशा परिस्थितीत किमान आपल्याशिवाय कोणी सत्तेपर्यंत पोहोचू नये इतकी ताकद निर्माण करायची आहे. भाजपबरोबर घरोबा केल्यामुळे मुस्लीम मते निजदपासून दुरावली आहेत. त्यांना पुन्हा जवळ करण्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीला आणखी दीड वर्षाहून अधिक काळ शिल्लक असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भविष्यात जर पुन्हा त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर भाजपला निजदबरोबर सख्य करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांची तयारीही आहे, म्हणून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे गुणगान सुरू आहे. संघाविरुद्धच्या वक्तव्याचे राजकीय परिणाम काय होणार? याची पुरेपूर कल्पना ठेवूनच कुमारस्वामी यांनी राजकीय चाल खेळण्याचे डाव सुरू केले आहेत. सध्यातरी भाजप व काँग्रेसपासून निजदने समान अंतर ठेवले तरी भविष्यात पुन्हा मैत्री करण्याची वेळ आली तर या दोन्ही पक्षांबरोबर जाण्याची निजदची तयारी आहेच. यावरून तत्व, आदर्श यांना राजकारणात कोणतेच स्थान नसते. जे काही आहे ते फक्त कोणत्याही मार्गाने सत्ता हस्तगत करण्यालाच महत्त्व असते, हे दिसून येते. अल्पसंख्याक मतांवर डोळा ठेवून कुमारस्वामी यांनी संघावर टीका केली आहे. सध्या कर्नाटकात याच मुद्दय़ावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱया झडून जी हमरीतुमरी केली जात आहे, त्यामागे केवळ सत्तासुंदरीला वश करण्याचा राजकीय हेतू आहे.








