वॉकिंग ट्रक, लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य, जलतरण तलावाचे निर्माण : उद्यानासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद
प्रतिनिधी / बेळगाव
हनुमाननगर येथील नाला व डोंगर म्हणून ओळखल्या जागेचा कायापालट करून टेनिस कोर्ट, अत्याधुनिक यंत्रोपकरणे असलेली खुली व्यायाम शाळा आणि जलतरण तलाव, उद्यान, आणि मॉर्निंग वॉकर्सकरिता वॉकिंग पाथ निर्माण करण्यात आले आहे. शहरातील स्मार्ट आणि खुली व्यायामशाळा असलेले अत्याधुनिक उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंगळवारी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
अमृत योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच डेनेज वाहिन्या घालने आदी कामांसह उद्यान निर्माण करण्यासाठी निधी मंजूर केला होता. पर्यावरणपूरक विकासकामे राबविण्यासाठी अमृत योजनेमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे हनुमाननगर येथील खुल्या जागेत स्मार्ट उद्यान निर्माण करण्यात आले आहे. सदर उद्यानासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद केली होती. वॉकिंग ट्रक, लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य, जलतरण तलाव आणि खुली व्यायामशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उद्यानाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले होते. पण कोरोना संक्रमणामुळे नागरिकांसाठी खुले करण्यात आले नाही. मात्र मंगळवारपासून उद्यान खुले झाले आहे. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते फीत कापून पूजन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त जगदीश के. एच., हनुमाननगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष राहुल मेत्री, कंत्राटदार एन. एस. चौगुले व मनपा अधिकारी उपस्थित होते.
नागरी सुविधा पुरविणे केवळ इतकीच जबाबदारी महानगरपालिकेची नाही. नागरी सुविधांसह जनतेचे हित जोपासणे तसेच आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी व्यायाम शाळा, मनोरंजन आणि क्रीडा उपक्रम राबविण्याची जबाबदारी आहे. यापूर्वी केवळ उद्यानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होती. पण धावत्या जगात अत्याधुनिक यंत्रोपकरणाची जोड देणे आवश्यक आहे. यासाठी आता महापालिकेने एक पाऊल पुढे टाकत क्रीडा संकुलाची आणि पहाटेच्या वेळी फिरावयास जाणाऱया नागरिकांसाठी खुली व्यायामशाळा निर्माण करण्यात आली आहे.
प्रशस्त जागेत क्रीडा संकुल
हनुमाननगर येथील प्रशस्त जागेत क्रीडा संकुल साकारण्यात आले आहे. महापालिकेला मंजूर झालेल्या 100 कोटी अनुदानातून हे प्रकल्प राबविण्यात आले आहेत. जलतरण तलावाकरिता तीन कोटी आणि खुली क्यायामशाळा व उद्यानाकरिता अडीच कोटीच्या निधी खर्ची घालण्यात आला आहे. हनुमाननगर वसाहत बुडाने निर्माण केली असून याठिकाणी नाला होता. तसेच डोंगराळ परिसर असल्यामुळे सदर जागा खुली जागा म्हणून राखीव ठेवण्यात आली आहे. या जागेचा कायापालट करून नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. एकदा घरातून निघाल्यानंतर उद्यानात फिरणे, खेळ खेळणे किंवा व्यायाम करणे, जलतरणाचा आनंद लुटण्याची सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ओसाड पडलेल्या जागेत नागरिकांसाठी राबविण्यात आलेले उपक्रम उपयोगी ठरले आहेत.









