सुधाकर काशिद / कोल्हापूर
कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना 1854 साली म्हणजेच 166 वर्षापुर्वी झाली. तेंव्हा कोल्हापूर शहराची हद्द जेवढी होती तेवढीच हद्द 1972 साली नगरपालिकेची महापालिका झाली तेव्हा राहिली. आणि आजही महापालिका होऊन 48 वर्षे झाली तरी हद्द एक इंचही न वाढता जशीच्या तशीच राहिली. अशा या हद्दीच्या जोखडातच राहिलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणाची आणि निवडणूक खर्चाची हद्द मात्र कधीच ओलांडली आहे. आणि या वेळची निवडणूक पुन्हा हद्दीची चर्चा सोबत घेऊनच होणार आहे. प्रभाग रचनेची अधिसुचना अजुन व्हायची आहे, पण रणांगण मे महिन्याच्या सुरवातीस रंगणार हे गृहीत धरुन हालचालींना चांगलाच वेग आला आहे.
कोल्हापूर महापालिका ही केवळ निवडणूकीपुरती नव्हे तर एक हाती सत्ता, दोन महिन्यांचा महापौर, तीन महिन्यांचा महापौर, मोकळ्या जागांवरील आरक्षण टाकणे, आरक्षण उठवणे, टेंडर घोटाळा, यापूर्वी निवडून आलेल्या काही नगरसेवकांचा काळ्या धंद्यांशी असलेला संबंध, निवडणूक प्रचारातील पाकीट संस्कृतीचा अतिरेक अशा विविध कारणांनी राज्यभर गाजलेली आहे. प्रशासकीय पातळीवर तर कोल्हापूर महापालिका नको रे बाबा, अशी नकारात्मक भूमिका अधिकाऱयांची झाली आहे.
ही अलीकडची परिस्थिती असली तरीही कोल्हापूर या छोटÎाशा गावात 1854 साली नगरपालिका स्थापन होण्यामागे तत्कालीन प्रशासनाची खूप उदात्त भूमिका दडलेली होती. नगरपालिका 1854 साली स्थापन झाली असली तरी या 1849 साली पॉलिटिकल सुप्रिटेंडंटच्या सुचनेवरुन एक आज्ञापत्र जाहीर करण्यात आले व रस्ते स्वच्छ करण्याची जबाबदारी नागरिकांवर टाकण्यात आली. त्यावेळी म्हणजे 166 वर्षांपूर्वी रस्त्यावर कचरा टाकणार्यांवर दंडाची तरतुद करण्यात आली. त्यानंतर 12 ऑक्टोबर 1854 साली नगरपालिकेची अधिकृत स्थापना झाली. सरकारनियुक्त 30 नगरसेवक नेमण्यात आले. त्यात न्यायाधीश, मामलेदार, शिक्षणअधिकारी, जेलर, शहर फौजदार, जगदगुरु शंकराचार्यांचे प्रतिनिधी, वकिल, कंत्राटदार, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व थरातील लोकांचा समावेश होता. या नगरपालिकेने पुढे 1972 पर्यंत काम केले. या काळातही राजकारण घडत राहीले. कोल्हापूर नगरपालिकेवर सातत्याने शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व राहीले.
1972 साली कोल्हापूर नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाले. हे रुपांतर का झाले ? हे त्यावेळीही व आज अखेरही कोल्हापूरकरांना कळालेले नाही. नगरपालिकेत त्यावेळी दोन गट पडले. आणि एका गटाच्या हट्टापायी नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. महापालिकेची घोषणा करण्यापूर्वी एक इंचही हद्दवाढ झाली नाही. फक्त नगरपालिका इमारतीच्या कमानीवर नगरपालिका शब्दासमोर `महा’ या शब्दाची जोड देण्यात आली.
महापालिका झाली आणि महापालिकेला पहिले प्रशासक द्वारकानाथ कपूर लाभले. या माणसाने मात्र, महापालिकेच्या कारभारात किती चांगली ताकद असते हे दाखवून दिले. त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गावर मास्टर प्लॅन राबवला. जकात व घरफाळा विभागातील भ्रष्टाचार मोडून काढला. कामचुकार कर्मचार्यांना थेट घरी पाठवले. राजकीय हस्तक्षेपाला महापालिकेच्या दरवाजातच रोखले. कोणताही गाजावाजा न करता वावरणार्या द्वारकानाथ कपूर यांनी प्रशासनात असा दरारा निर्माण केला की सारा कारभार रुळावर आला. कपूर यांच्याच काळात रंकाळा चौपाटी झाली. मात्र, त्यांच्या कामाची ही धडाडी काही राजकारणी मंडळींना रुचली नाही. आपल्यासारख्या राजकीय नेत्यापेक्षा एखादा अधिकारी लोकप्रिय होतोय हे एकच पक्ष नव्हे सर्वच पक्षांच्या नेत्यांना त्या काळी आवडले नाही आणि त्यामुळे कपूर यांना कोल्हापूरात तीन वर्षाहून अधिक काळ राहता आले नाही. मात्र, 1972 ते 1975 ही त्यांची कारकिर्द आजअखेर लोकांच्या स्मृतीतून गेलेली नाही.
1978 साली महापालिकेची पहिली निवडणूक झाली. त्यावेळी आयुक्त होते डी. टी. जोसेफ. ही पहिली निवडणूक अटीतटीची झाली. मात्र या निवडणुकीत जे उभे होते ते राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज कार्यकर्ते होते. या निवडणुकीत सत्ता काँग्रेस प्रणित आघाडीच्या ताब्यात आली. सर्व नगरसेवक अपक्ष होते. पण काँग्रेसला मानणारे होते. श्रीपतराव बोंद्रे यांनी नेतृत्व केले होते. त्यांनीच या निवडणुकीनंतर पहिला महापौर निश्चित केला. बाबासाहेब कसबेकर यांना पहिले महापौर होण्याचा मान मिळाला.
यानंतर म्हणजे आजअखेर आठवेळा महापालिकेची निवडणूक झाली. साठ नगरसेवकांची संख्या 81 वर जाऊन पोहोचली. महापालिकेचे नेतृत्व श्रीपतराव बोंद्रे, उदयसिंगराव गायकवाड यांच्याकडून महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, अरुण नरके, यांच्याकडे आले. त्यानंतर सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे यांच्याकडे आले. शिवसेनेचा पहिला नगरसेवक होण्याचा मान चंद्रकांत साळोखे यांना मिळाला. भाजप-ताराराणी आघाडीनेही महापालिकेत आपले बर्यापैकी स्थान निर्माण केले. तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही गेल्या निवडणुकीत चांगले लक्ष घातले.
महापालिकेची आता नववी निवडणूक होत आहे. या आठ निवडणुकीतील घडामोडी, कारभार सतत टिकेचा आणि वादाचा ठरला आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत इर्षा टोकाला पोहोचली आहे. आताही तेच घडते आहे. आणि या नवव्या निवडणुकीच्या सावटातच सध्या सारे कोल्हापूर आहे.
पहिले प्रशासक- द्वारकानाथ कपूर
पहिले महापौर – बाबासाहेब कसबेकर
पहिले आयुक्त – डी. टी. जोसेफ
पहिले उपमहापौर – बाबुराव निगडे
पहिले स्थायी समिती सभापती- सुभाष वोरा
पहिली महिला महापौर- जयश्री जाधव
पहिले काँग्रेस नगरसेवक -बशिर पटेकर
पहिले शिवसेना नगरसेवक – चंद्रकांत साळोखे
पहिले जनता दल नगरसेवक – यशवंत खाडे, शरद सामंत
पहिले हिंदुत्ववादी नगरसेवक – सुभाष वोरा
पहिले शेकापक्षाचे नगरसेवक – संभाजीराव चव्हाण, एम.के.जाधव, एन. डी. जाधव, शिवाजीराव जाधव.
शेकापक्षाचे पहिले महापौर – नानासाहेब यादव
पहिले महापौर व उपमहापौर दांपत्य- बंडोपंत नायकवडे, सुलोचना नायकवडे
पाणी प्रश्नावर राजीनामा दिलेले पहिले महापौर – रामभाऊ फाळके
-सत्तारुढ गटाला धक्का देत महापौर झालेले बाबू फरास
1854 साली विविध क्षेत्रातील 30 नगरसेवक
त्यानंतर 12 ऑक्टोबर 1854 साली नगरपालिकेची अधिकृत स्थापना झाली. सरकारनियुक्त 30 नगरसेवक नेमण्यात आले. त्यात न्यायाधीश, मामलेदार, शिक्षणअधिकारी, जेलर, शहर फौजदार, जगदगुरु शंकराचार्यांचे प्रतिनिधी, वकिल, कंत्राटदार, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व थरातील लोकांचा समावेश होता.









