प्रतिनिधी/गोडोली
ऐतिहासिक सातारा शहराची हद्दवाढ झाली असली तरीही या समावेश झालेल्या भागात नगरपालिकेकडून कोणत्याही सुविधा किंवा उपाययोजनांना अद्यापही सुरुवात झालेली नाही. शहराचा विकास हा श्रेयवाद हा कायमचं राजकीय झांगडगुत्त्यात अडकलेला आहे. सध्या नव्याने समावेश झालेल्या भागात कचरा संकलनासाठी फक्त घंटा गाडी फिरते. मात्र सांडपाणी, नियमित स्वच्छता, पक्के रस्ते, सर्वत्र पथदिवे, आरोग्य व्यवस्थेसाठी नगरपालिकेने अद्यापही काही ही केलेले नाही, तर सध्या प्रशासकीय राजवट असूनही याबाबत काहीही हालचाली नसल्याने स्वच्छतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवणाऱया नगरपालिकेची प्रशासकीय कारभार अनेक शंका उपस्थित करतो.
ऐतिहासिक सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला नगरपालिकेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध होतील, त्यासाठी नेते आणि तत्कालीन नगराध्यक्षांनी प्रसार माध्यमातून सतत भुलभुलय्या वक्तव्य केली. मुलभूत सुविधा देण्याबरोबरच शहराचा लौकिक वाढविणारा विकास होईल, असेच प्रत्येकाने नेत्यांनी गाजर दाखवले. मात्र प्रत्यक्षात फक्त कचरा गाडय़ातून कचरा संकलनाशिवाय काही झाले नाही. सध्या सांडपाणी कुठेही वाहते, सार्वजनिक ठिकाणी कचरा पडलेला दिसतो, रस्ते नाहीत, पथदिवे नाहीत, नियमित झाडलोट करणारे अजूनही या भागात फिरकत नाहीत, पाणी पुरवठा सर्व ठिकाणी नियमित नाही, तो कमी दाबाने होतो. राजकीय पक्षांकडून विकास कामात दुजाभाव होऊ शकतो, असे स्पष्ट आहे. मात्र सध्या प्रशासकीय राजवट असताना ही नव्याने समावेश झालेल्या भाग हा अस्वच्छ, सुविधांची वाणवा असूनही कोणत्याही उपाययोजना राबविण्यासाठी हालचाल नाही. उलट पालिकेच्या कारभारात कोणाचा ही वचक नसल्याचे दिसून येते. काम नाही झाले तरी चालेल पण कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, असे मुख्याधिकारी वागतात.
निवडणूक कधी होईल, हे अजूनही निश्चित नसल्याने आधीच निरुत्साही असणारे कर्मचारी सध्या बिनधास्त मूडमध्ये दिवस भरताना दिसत आहेत. नव्याने समावेश झालेली भागातील नागरिक सध्या पालिकेच्या कारभाराने हैराण झाले असून भविष्यात कोणती परिस्थिती निर्माण होईल, याचीच चिंता व्यक्त करतात.









