प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि शाहूपुरीसह उपनगरांचा सातारा पालिकेत समावेश झाला आहे. मात्र, हद्दवाढ करताना आमसभेत गावठाण विस्तार करण्याच्या प्रस्ताव मंजूर करुन घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शाहूपुरीतील नागरिकांना महसूल खाते व पालिकेचा कर असे दोन-दोन करावे भरावे लागत आहेत. तर पालिकेकडून मूलभूत सुविधा मिळण्यात अडचणी होत असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते चेतन खराडे व जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघाचे चेअरमन नंदकुमार काटे यांनी केली आहे.
याबाबत खराडे व काटे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, शहर हद्दवाढीची घाई करण्याआधी गावठाण हद्दवाढ करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणे आवश्यक होते. ते न केल्याने शाहूपुरीतील नागरिकांना तलाठय़ाकडे भरावा लागणारा एन. ए. कर, स्थानिक स्वराज्य संस्थेकडे भरावा लागणारा कर, तिसरा गृहनिर्माण संस्थांकडे भरावा लागणारा कर, अपार्टमेंट वर्गणी कर भरावे लागत आहेत. हे सर्व कर वेळेत भरुनही सातारा शहराची हद्दवाढ झाल्यापासून शाहूपुरीकरांना विकासापासून वंचित रहावे लागत आहे. गेंडामाळ नाका ते शाहूपुरी चौक या मुख्य रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. नागरिकांनी काही ठिकाणी स्वखर्चाने रस्ते दुरुस्त करुन घेतले असून सध्या शाहूपुरीत रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत, नाल्यांची झालेली दूरवस्था व त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी, डासांची वाढ यामुळे डेंग्यूची साथ फैलावत आहे. नागरिकांच्या खर्चातून केलेल्या अनेक स्ट्रीट लाईट सध्या बंद अवस्थेत आहेत. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही बसवण्याची मागणीही खराडे व काटे यांनी केली आहे.









