प्रशासनाचे स्पष्टीकरण, मनपात सेवा बजावणाऱयांना हंगामी स्वच्छता कामगारांना दिलासा
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेत हंगामी तत्वावर काम करणाऱया स्वच्छता कामगारांना नुकसान भरपाई देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र हंगामी स्वच्छता कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 30 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सदर नुकसान भरपाई महापालिकेच्या एसएफसी अनुदानामधून देण्याची सूचना नगर प्रशासनाने केली आहे. त्यामुळे हंगामी तत्वावर स्वच्छता काम करणाऱया कामगारांना देखील दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या कामगारांना 30 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र महापालिकेत विविध विभागात हंगामी तत्वावर कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामगारांना कोरोना काळातही कामे लावण्यात आली होती. सध्या कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. सर्वत्र कोरोनाची रूग्ण असल्याने स्वच्छतेचे काम महापालिकेला करावेच लागते. कायमस्वरूपी कामगारांसह मनपाच्या स्वच्छता विभागात एक हजारहून अधिक स्वच्छता कामगारांची नियुक्ती कंत्राट पद्धतीने करण्यात आली आहे. पण हंगामी कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई देण्याबाबत कोणतेच स्पष्टीकरण राज्य शासनाने दिले नव्हते. केवळ सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱयांनाच 30 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशात नमुद केले होते. त्यामुळे बेळगाव महापालिकेसमोर पेच निर्माण झाला होता.
शहरात स्वच्छतेचे काम करीत असताना कोरोनाची लागन झाल्याने कंत्राटपद्धतीने काम करणाऱया महिला स्वच्छता कर्मचाऱयाचा मृत्यू झाला होता. तसेच कायमस्वरूपी कर्मचाऱयाचा देखील मृत्यू झाला होता. शासनाकडून केवळ कायमस्वरूपी स्वच्छता कामगाराला नुकसान भरपाई म्हणून 30 लाख रूपये मंजुर करण्यात आले होते. पण कंत्राट पद्धतीने काम करणाऱया कामगार महिलेला नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती. याबाबत महापालिकेकडे विचारणा केली असता शासनाकडुन याबाबत माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी वारसदारांनी दावा केल्यानंतर महापालिकेच्या वतीने नगरविकास खात्याला पत्र पाठवून हंगामी स्वच्छता कामगारांच्या नुकसान भरपाई बाबत स्पष्टीकरण विचारले होते. महापालिकेत हंगामी तत्वावर स्वच्छता काम करणाऱया कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 30 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची सूचना केली आहे. सदर निधी एसएफसी अनुदानातून देण्यात यावा. असे स्पष्टीकरण नगरविकास खात्याने महानगरपालिकेला दिले आहे. त्यामुळे हंगामी स्वच्छता कामगारांना देखील दिलासा मिळाला आहे. महापालिकेत हंगामी तत्वावर सेवा बजावणाऱया महिला स्वच्छता कर्मचाऱयाचा कोरोनाची लागन होऊन मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या वारसदारांना 30 लाख रूपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.









