पाणीपुरवठा मंडळात कार्यरत कर्मचाऱयांना 10 जुलैपर्यंत प्रतीक्षा करण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
पाणीपुरवठा मंडळाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आल्याने दि. 1 जुलैपासून कामकाज सुरू झाले आहे. पण कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या बिल कलेक्टर व लेखा विभागात काम करणाऱया कामगारांकडे कोणतीच जबाबदारी सोपविण्यात आली नाही. दि. 10 जुलैपर्यंत प्रतीक्षा करण्याची सूचना करण्यात आल्याने पाणीपुरवठा मंडळात काम केलेल्या कामगारांना एल ऍण्ड टी कार्यालयासमोर ठाण मांडून बसावे लागत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱया पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यालयात 330 हून अधिक जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या आहेत. यामध्ये बिल कलेक्टर, लेखा विभाग, क्हॉल्वमन, गळती निवारण करणारे कामगार आणि वाहनचालकांचा समावेश आहे. पण चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे दि. 1 जुलैपासून एल ऍण्ड टी कंपनीने कामकाज सुरू केले आहे. पण सध्या सहा महिन्यांपर्यंत एल ऍण्ड टी कंपनीच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा मंडळाला पाणी पुरवठय़ाचे कामकाज पाहावे लागणार आहे. पण पाणीपट्टी, विकासकामे, गळती निवारण आदी सर्व कामांचा निर्णय एल ऍण्ड टी कंपनी घेणार आहे. त्यामुळे बिल कलेक्टर, व्हॉल्वमन आणि लेखा विभागात हंगामी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कामगारांना एल ऍण्ड टी कंपनीकडे काम करावे लागणार आहे.
कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
सध्या व्हॉल्वमन व जलशुद्धीकरण केंद्रात, पंपहाऊस अशा ठिकाणी कार्यरत असलेले हंगामी कामगार कामावर रुजू आहेत. मात्र, बिल कलेक्टर आणि लेखा विभागात काम करणाऱया हंगामी कामगारांना दि. 10 जुलैपर्यंत प्रतीक्षा करण्याची सूचना करण्यात आली आहे. पण कामाची जबाबदारी नसल्याने हंगामी कामगार विश्वेश्वरय्या नगरमधील पाणीपुरवठा मंडळ कार्यालय आवारात असलेल्या एल ऍण्ड टी कंपनीच्या कार्यालयात हजर होत आहेत. एल ऍण्ड टी कंपनीच्या कार्यालयात कामगारांना बसण्याची सुविधा उपलब्ध नाही. बिल कलेक्शन सेंटरही निश्चित करण्यात आले नाही. त्यामुळे सदर कामगार कार्यालयासमोर थांबत आहेत. मात्र, हंगामी कामगारांना कामावर घेणार की नाही, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे हंगामी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









