पाणीपुरवठा नियोजनाचे काम ‘एल ऍण्ड टी’कडे सोपविल्याने कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर
प्रतिनिधी /बेळगाव
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरणासाठी पाणीपुरवठा नियोजनाचे कामकाज ‘एल ऍण्ड टी’ कंपनीकडे दि. 1 जुलैपासून सोपविण्यात आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाकडे हंगामी तत्त्वावर काम करणाऱया कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही कामगारांना कामावर येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे हंगामी कामगारांना रोजगार गमाविण्याची वेळ आली आहे.
एकीकडे शहरवासियांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पण दुसरीकडे पाणीपुरवठा विभागात काम करणाऱया हंगामी कामगारांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यालयात काही अधिकारी कायमस्वरूपी होते तर व्हॉल्वमॅन आणि काही कामगार हंगामी तत्त्वावर घेण्यात आले होते. विशेषतः बिलिंग विभागात व अकाऊंट विभागात हंगामी तत्त्वावरील कामगार कार्यरत आहेत. पण चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीचे काम एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. सदर योजना राबविण्यास चार वर्षांचा कालावधी लागणार असून जलवाहिन्या घालणे, नळजोडण्या करणे, अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील आठ वर्षांकरिता देखभाल करण्याची जबाबदारी एल ऍण्ड टी कंपनीकडे राहणार आहे. येथे अभियंत्यांची नियुक्ती करून अकाऊंट पाहण्यासाठी कामगारांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाकडे काम करणाऱया हंगामी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तोडगा काढण्याची गरज…
पाणीपुरवठा नियोजनाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आल्यानंतर कामगारांना ठेवायचे की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे कामगारांनी पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना भेटून कामाबाबत विचारणा केली असता एल ऍण्ड टी कंपनीकडे काम करण्याची सूचना केली आहे. पण एल ऍण्ड टी कंपनीला सर्व कामगारांची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काही कामगारांना कामावर घेण्यास मज्जाव सुरू आहे. त्यामुळे हंगामी कामगारांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत आवश्यक तोडगा काढावा, अन्यथा हंगामी कामगार बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे.









