प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, माजी सहकारमंत्री स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या 17 व्या स्मृती दिनानिमित्त गुरुवार दि. 4 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्मृतिदिनानिमित्त सकाळी 9 वाजता शाहूनगर- शेंद्रे ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण व पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन कार्यक्रम होणार आहे. गजवडी ता. जि. सातारा येथे स्वराज्य क्रीडा मंडळ सोनवडी- गजवडी व श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खो- खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा पंचायत समिती यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, सोसायटय़ा आदी कार्यालयात व संस्थांमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे.








