123 वर्षांपासून झ्यूरिच शहरात सुरू
जगातील सर्वात जुने शाकाहारी रेस्टॉरंट अशा देशात तेव्हा सुरू झाले, जेव्हा तेथील लोक शाकाहाराबद्दल विचार देखील करत नव्हते. हे रेस्टॉरंट स्वीत्झर्लंडच्या झ्यूरिच शहरात आहे. 1898 पासून सुरू असलेले हे रेस्टॉरंट जगातील सर्वात जुने शाकाहारी रेस्टॉरंट असल्याचे मानले जाते.
पूर्णपणे शाकाहारी खाद्यपदार्थ मिळणाऱया या रेस्टॉरंटचे नाव हौस हिल्ड आहे. हे रेस्टॉरंट एकाच घराण्याचे लोक पिढय़ा-न-पिढय़ा वारशाप्रमाणे सांभाळत आले आहेत. या रेस्टॉरंटचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे. एवढेच नाही तर तेथे भारतीय थाळी व्यवस्था देखील उपलब्ध आहे.

120 वर्षांपूर्वी हिल्ट कुटुंबाच्या एम्ब्रोसियस हिल्ट यांनी या रेस्टॉरंटची सुरुवात स्वतःच्या कुटुंबाच्या शाकाहारी खाद्यपदार्थाची ओळख शहराला करून देण्यासाठी केली होती. तेव्हा याचे नाव व्हेजेटेरियरहाइम अँड ऍबसस्टियन्स-कॅफे असे होते. येथील मेन्यूमध्ये बटाटा तसेच मूळ असलेल्या अन्य भाज्या असायच्या. त्यानंतर अनेकदा या रेस्टॉरंटच्या नावात बदल झाला आणि मेन्यूतही खाद्यपदार्थांची भर पडत गेली.
तत्कालीन काळात युरोपमध्ये शाकाहार प्रचलित नव्हता. अशा स्थितीत रेस्टॉरंट सुरू झाल्यावर शहरात अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. हिल्ट कुटुंबाला मूर्ख ठरविण्यात आले. तरीही कुटुंबाने रेस्टॉरंट बंद केले नाही आणि अखेरीस स्वतःच्या अनोखेपणामुळे हे रेस्टॉरंट जोरात चालू लागले.
शाकाहार आणि वीगन जीवनपद्धतीचे लाभ समोर आल्यावर 1951 पासून या रेस्टॉरंटची मागणी वाढली. तेथे आता स्वीस, आशियाई, मेडिटेरेनियन, भारतीय तसेच सर्वप्रकारचे शाकाहारी पदार्थ मिळतात. येथील सर्वात विशेष खाद्यपदार्थ झ्यूरर्चर गेस्चझेलटेस हा स्वीस खाद्यपदार्थ आहे.
पुस्तकेही उपलब्ध

हौस हिल्ट पाचमजली रेस्टॉरंट असून तेथे हजारो पुस्तके देखील मिळतात. ही सर्व पुस्तके जगभरातील शाकाहारी पदार्थांची माहिती देणारी आहेत. मीट द ग्रीन या रेस्टॉरंटचे सर्वात लोकप्रिय वैशिष्टय़ आहे. झ्यूरिचचे बहुतांश लोक मांसाहारी असल्याने शाकाहाराला बळ देण्यासाठी रेस्टॉरंट मालकाने मीट द ग्रीन नावाने कुकबुक लिहिले. यात 60 अशा मीट आणि फिश डिशेजबद्दल लिहिण्यात आले आहे, ज्यात प्रत्यक्षात मीट किंवा फिशचा वापर करण्यात आलेला नाही. यात दूध आणि सोयाद्वारे तयार उत्पादनांचा वापर करण्यात आला आहे. येथे लोकांना शाकाहारी पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात येते.









