जगातील सर्वात कमी वेगाने धावणाऱया रेल्वेचा दर्जा स्वीत्झर्लंडच्या ग्लेशियर एक्स्प्रेसला देण्यात आला आहे. स्वीत्झर्लंडच्या उंच शिखरांवर ही ग्लेशियर एक्स्प्रेस धावते. जेरमार्ट आणि सेंट मॉर्रिट्ज या स्थानकांना ही रेल्वेगाडी जोडते. म्हणायला ही एक्स्प्रेस रेल्वे आहे, ज्याचा वेग सामान्य रेल्वेगाडय़ांपेक्षा अधिक असायला हवा, पण वास्तव असे नाही. सुमारे 290 किलोमीटरचे अंतर ही रेल्वेगाडी 10 तासांमध्ये पूर्ण करते. याचमुळे याला जगातील सर्वात मंदगतीची एक्स्प्रेस रेल्वे म्हटले जाते.
उंच पर्वतांदरम्यान या ग्लेशियर एक्स्प्रेसची सुरुवात 1930 मध्ये झाली होती. प्रारंभी ही रेल्वे केवळ उन्हाळय़ात धावायची, कारण हिमाच्छादित पर्वतांवर कुणीच ये-जा करत नव्हते. पूर्वी यात प्रवासी डबे जोडण्यात आले होते, जे अत्यंत असुविधाजनक होते. यात उंच पर्वतांवरून जाताना प्रवाशांकरता स्वच्छतागृहाची सुविधाही नव्हती. पण कालौघात यात सुधारणा होत असून रेल्वेच्या मालक कंपन्याही बदलल्या आहेत.
सर्वात कमी वेगाने धावणारी रेल्वे असूनही जगभरातील पर्यटक याचा अनुभव घेत आहेत. सुमारे 290 किलोमीटरच्या मार्गात सर्वत्र हिमाच्छादित शिखरे दिसून येतात. तर प्रवासात 91 भुयारे आणि 291 पुलांना ओलांडावे लागते. प्रवासादरम्यान अनेकदा मोठे उतार-चढाव येतात, अशा स्थितीत प्रवाशांना विशेष वाइन देऊन त्यांना पोटदुखी किंवा उलटय़ा होऊ नयेत याची काळजी घेण्यात येते.









