युरो चषक फुटबॉल चॅम्पियनशिप – शेवटच्या पेनल्टीपर्यंत लढणाऱया फ्रान्सविरुद्ध 5-4 फरकाने निसटता विजय,
बुचारेस्ट / वृत्तसंस्था
यान सॉमरच्या अप्रतिम गोलरक्षणाच्या बळावर स्वित्झर्लंडने फ्रान्सचा 5-4 अशा निसटत्या फरकाने पराभव करत तब्बल 67 वर्षात प्रथमच एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. 90 मिनिटांचा रेग्युलर टाईम व .30 मिनिटांच्या एक्स्ट्रा टाईममध्ये देखील 3-3 बरोबरीची कोंडी कायम राहिल्याने या लढतीत पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला गेला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला सुपरस्टार खेळाडू एम्बापेचा फटका थोपवला गेल्याचा मोठा फटका बसला.
मागील वर्ल्डकप फायनलमध्ये एम्बापे सामन्याचा हिरो ठरला होता. अवघ्या 18 व्या वर्षी त्याने अवघ्या फुटबॉल विश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. येथे मात्र निर्णायक पेनल्टी नोंदवता न आल्याने त्याच्या स्टारडमसाठी देखील हा मोठा धक्का ठरला. स्वीस गोलरक्षक सॉमरने एम्बापेचा फटका थोपवल्यानंतर स्वित्झर्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आणि त्याच्या सर्व संघसहकाऱयांनी एकच जल्लोष केला.
‘आम्हा सर्वांसाठी आजची लढत विशेष रोमांचक होती. आम्ही यापूर्वी या स्पर्धेच्या इतिहासात शेवटच्या 16 मध्ये कधीच पोहोचलो नव्हतो. पण, आज आमच्या जिद्दीला यश आले’, असे सॉमर या लढतीबद्दल बोलताना म्हणाला. 1954 विश्वचषक स्पर्धेत यजमानपद भूषवणाऱया स्वित्झर्लंडने एकदाही उपांत्यपूर्व फेरी गाठली नाही. मात्र, येथे त्यांनी हा इतिहास मोडीत काढला. त्यांनी प्री-क्वॉर्टर्समध्ये सलग 3 पराभवांची शृंखला देखील खंडित केली. या संघाला युरो 2016 मध्ये पोलंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला होता.
फ्रान्स संघाचे विद्यमान प्रशिक्षक डेशचॅम्प्स यांनी 20 वर्षांपूर्वी खेळाडू या नात्याने जेतेपद मिळवून दिले होते. मात्र, येथे प्रशिक्षक या नात्याने जेतेपद संपादन करुन देण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. ‘आमच्या पथकातील प्रत्येक जण या निकालामुळे निराश झाला आहे. पण, आमचा संघ यापुढेही ताज्या दमाने मैदानात उतरेल’, असे डेशचॅम्प्स येथे म्हणाले.
उभय संघातील ही लढत रेग्युलर टाईममध्ये 3-3 अशा बरोबरीत राहिली. स्वित्झर्लंडतर्फे हॅरिस सेफेरोव्हिकने 15 व्या व 81 व्या मिनिटाला तर मॅरिओ गॅव्हरोनाव्हिकने 90 व्या मिनिटाला गोल केले. फ्रान्सकडून करिम बेन्झेमाने 57 ते 59 या अवघ्या 3 मिनिटात 2 गोल केले तर पॉल पोग्बाने 75 व्या मिनिटाला संघाचा तिसरा व शेवटचा गोल केला. निर्धारित वेळेतील ही 3-3 गोलबरोबरी 30 मिनिटांच्या जादा वेळेतही कायम राहिली आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला गेला.
एम्बापेची पेनल्टी अडविणारा स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सॉमर
दुसऱया कन्येच्या स्वागतानंतर मैदानावर परतलेला गोलरक्षक यान सॉमर विजयाचा शिल्पकार
स्वित्झर्लंडचा गोलरक्षक आपल्या दुसऱया कन्येच्या स्वागतासाठी या स्पर्धेच्या साखळी फेरीदरम्यान जर्मनीकडे रवाना झाला होता. इटलीविरुद्ध 0-3 असा नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याला जर्मनीला जावे लागले. पत्नीसमवेत इस्पितळात थांबता यावे, यासाठी त्याने हा निर्णय घेतला. दि. 16 जून रोजी अपत्यप्राप्ती झाल्यानंतर त्याने पुन्हा युरो चषकासाठी संघात परतणे पसंत केले. येथे फ्रान्सविरुद्ध प्री-क्वॉर्टर्स लढतीत सुपरस्टार फॉरवर्ड किलियन एम्बापेची शेवटची पेनल्टी थोपवत त्याने आपले स्पर्धेतील पुनरागमन सार्थ ठरवले!
दुसऱयांदा ‘बॅक टू बॅक टायटल’ जिंकण्यात फ्रान्सला अपयश
फ्रान्सचा संघ ‘बॅक टू बॅक टायटल’ जिंकण्यासाठी येथे दुसऱयांदा प्रयत्नशील होता. यापूर्वी 1998 मध्ये फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी 2000 ची युरो स्पर्धा जिंकत असा पराक्रम एकदा गाजवला होता. यापूर्वी 2018 वर्ल्डकप जिंकला असल्याने येथे युरो स्पर्धा जिंकत ते पुन्हा एकदा लागोपाठ टायटलचे मानकरी ठरणार का, याची उत्सुकता होती. मात्र, स्वित्झर्लंडविरुद्ध धक्कादायक पराभवानंतर प्रेंच संघाची ही संधी हिरावली गेली.









