युरो चषक फुटबॉल चॅम्पियनशिप : स्पॅनिश ब्रिगेडची अवघ्या 18 वर्षांच्या पेड्री गोन्झालेझवर भिस्त, स्वित्झर्लंडचा संघ आणखी एक चमत्कार घडवणार का?
वृत्तसंस्था /सेंट पीटर्सबर्ग
प्रतिष्ठेच्या युरो चषक स्पर्धेत आजपासून (शुक्रवार दि. 2) उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगणार असून पहिल्या लढतीत स्वित्झर्लंड-स्पेन यांच्यात जोरदार रस्सीखेच रंगणे अपेक्षित आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 9.30 वाजता या लढतीला प्रारंभ होईल.
अतिशय कल्पक चाली रचणारा व बार्सिलोनाचा ‘टेक्निकली गिफ्टेड’ मिडफिल्डर पेड्री गोन्झालेझवर स्पेनची या लढतीतही मुख्य भिस्त असेल. दुसरीकडे, मागील लढतीत फ्रान्ससारख्या अव्वल प्रतिस्पर्ध्याला धूळ चारल्याने स्वित्झर्लंडचे मनोबल उंचावलेले असेल. साहजिकच, या दोन्ही संघात तुल्यबळ लढतीची अपेक्षा असणार आहे. झेवी व इनेस्टा यांनी 2008 व 2012 मध्ये स्पॅनिश फुटबॉलला सोनेरी पर्व मिळवून दिले. अशीच संधी आता पेड्री गोन्झालेझकडे असणार आहे.
स्पेनच्या ‘सेंट्रल मिडफिल्ड थ्री’ गेमप्लॅनचा मुख्य भाग असणारा पेड्री डाव्या बाजूने खेळतो आणि ही त्याच्यासाठी पहिलीच जागतिक स्पर्धा आहे. यापूर्वी मार्चमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये खेळणारा सर्वात तो तरुण स्पॅनिश खेळाडू बनला असून क्रोएशियाविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडूही ठरला. स्पॅनिश संघातील दोन आऊटफिल्ड खेळाडू यंदाच्या युरो स्पर्धेतील आपल्या प्रत्येक लढतीत पूर्ण वेळ खेळले आहेत आणि त्यात पेड्रीचा प्राधान्याने समावेश आहे. पेड्री आपल्यासाठी युनिक खेळाडू आहे, असे स्पॅनिश प्रशिक्षक लुईस एनरिक्यू यांनी यापूर्वी म्हटले आहे.
वास्तविक, क्रोएशियाविरुद्ध पेड्रीचा बॅक-पास हाताळण्यात गोलरक्षक सिमॉनने हलगर्जी केल्यानंतर स्पेनवर स्वयंगोलाची नामुष्की आली होती. मात्र, पेड्रीने मैदानी खेळात वर्चस्व गाजवत त्या स्वयंगोलाची भरपाई करण्यात कसर सोडली नाही. पेड्रीचा स्पेनच्या टोकियो ऑलिम्पिक स्पॅनिश संघातही समावेश आहे.
स्वित्झर्लंडला कर्णधाराची उणीव जाणवणार?
एकीकडे, स्पॅनिश संघाचा मिडफिल्डवर अधिक भर असताना स्वित्झर्लंडला याच आघाडीवर कर्णधार ग्रॅनिटची उणीव जाणवणार का, हे या लढतीत स्पष्ट होईल. ग्रॅनिटला निलंबनामुळे येथे खेळता येणार नाही.
बेल्जियम-इटली यांच्यातही जोरदार जुगलबंदीची अपेक्षा

म्युनिच : युरो चषक स्पर्धेत दिवसभरातील दुसऱया उपांत्यपूर्व लढतीत आज बेल्जियम-इटली यांच्यासारखे तगडे संघ आमनेसामने भिडणार असून यामुळे, या लढतीत देखील जोरदार जुगलबंदी अपेक्षित आहे. हा सामनया मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होणार आहे. क्लब स्तरावर इंटरमिलानकडून खेळणारा फॉरवर्ड रोमेलू लुकाकूकडून इटलीला मुख्य धोका असून यामुळे इटालियन संघ त्याच्यावरच मुख्य लक्ष केंद्रित करत असेल तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. केव्हिन डी ब्रुएन व ईडन हॅझार्ड हे दोघेही या लढतीत खेळू शकणार का, याबद्दल साशंकता आहे.
विश्वचषकात तिसरे स्थान संपादन केल्यानंतर बेल्जियमचा संघ येथे 3 वर्षांनंतर पहिली महत्त्वाची स्पर्धा जिंकण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरु शकेल. त्यांनी मागील 13 सामन्यात एकही पराभव पत्करलेला नाही आणि सध्या जागतिक क्रमवारीतही तेच अव्वलस्थानी आहेत. दुसरीकडे, इटालियन संघ देखील मागील 31 सामन्यांपासून अपराजित आहे. फक्त राऊंड ऑफ 16 मध्ये ऑस्ट्रियाने त्यांना एक्स्ट्रा टाईमपर्यंत झुंजवले
होते.
बेल्जियम व इटली या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील सर्व तीनही सामने जिंकले आहेत. शिवाय, फ्रान्स, पोर्तुगाल, नेदरलँडस्, जर्मनी हे बलाढय़ संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे, म्युनिचमधील या लढतीत जो संघ जिंकेल, तो जेतेपदासाठी फेवरीट ठरु शकतो. व्यावसायिक सामन्यात बेल्जियमला इटलीने फक्त एकदाच-1972 युरो उपांत्यपूर्व फेरीत नमवले असून याची पुनरावृत्ती करण्यात ते यशस्वी होणार का, हे देखील आज स्पष्ट होईल.









