प्रतिनिधी/ रत्नागिरी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत राष्ट्र, भारतातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन ही राष्ट्र निर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी येथे केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात भारतीय इतिहास संशोधन परिषद, नवी दिल्ली (आय.सी.एच.आर.) आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत भारतीय इतिहास संशोधन परिषद, नवी दिल्लीमार्फत स्वा. सावरकर यांच्यावरील ’जातिवाद नष्ट करणेः सावरकरांकडून हिंदुत्वाचे धडे अनिवार्य’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले, कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत, सरस्वती वंदना, सावरकरांच्या पुतळ्याचे पूजन आणि द्वीपप्रज्वलनाने झाली.
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली असली तरी आजही भारतात काही गावांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. भारतातून ही जातीयता जेव्हा नष्ट होईल तेव्हाच खऱया अर्थाने समाज, राष्ट्र सुस्थिर होईल. भारतीय जातीव्यवस्था, अस्पृश्यता निर्मूलनासाठी सावरकर यांनी रत्नागिरीत केलेले कार्ये अत्यंत महत्वपूर्ण असल्याने सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत ही राष्ट्रीय परिषद होणे ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे. सावरकर सामाजिक समतेचे मोठे पुरस्कर्ते होते. आज देशाला सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असून, नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचेही ते पुढे म्हणाले.
याप्रसंगी व्यासपीठावर घासीदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. अशोक मोडक, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ला, बीजभाषक केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे रणजित सावरकर
आय.सी.एच.आर.चे सदस्य सचिव प्रा. कुमार रत्नम, परिषदेचे समन्वयक आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. उमेश अशोक कदम आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रा. उमेश अशोक कदम यांनी परिषदेची संकल्पना, सावरकरांचे विचार आणि कार्ये समजून घेण्याची आवश्यकता विशद केली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय इतिहास संशोधन परिषद, नवी दिल्लीचे सदस्य सचिव प्रा. कुमार रत्नम होते.
उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, प्रा. हिमांशु चतुर्वेदी, डॉ. नीरज श्याम देव, अक्षय जोग, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे आदींसह संस्थेचे पदाधिकारी, रत्नागिरीतील स्वा. सावरकरप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन आय.सी.एच.आर.च्या सहाय्यक संचालक डॉ. नुपूर सिंग यांनी केले.









