प्रतिनिधी / सातारा :
केंद्र सरकारने तीन काळे कृषी कायदे अखेर मागे घेतले, हा स्वातंत्र्यानंतरचा कृषीप्रधान भारत देशातील संपूर्ण शेतकरी एकजुटीचा विजय आहे. असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांच्यावतीने सातारा येथे जुन्या छ. शिवाजीमहाराज संग्राहलयासमोर साखर वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले, या विजयासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे. हे प्रत्येक शेतकऱ्याने ध्यानात ठेवले पाहीजे. शेतकऱ्यांना वर्षभराहुन अधिक काळ घरदार सोडुन आंदोलन करावे लागले. कित्येक शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. पोलीसांचा मार खावा लागला, गाडीखाली चिरडण्यात आलं. तरीही शेतकऱ्यांनी माघार घेतली नाही. त्याच एकजुटीचा आज विजय झाला आहे. परमेश्वराने केंद्र व राज्य सरकारला सुबुध्दी देवुन शेतकरी हीताचे निर्णय घ्यावेत, असेही शेळके म्हणाले.
यावेळी अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, हेमंत खरात, विजय चव्हाण, संजय जाधव, राम मोरे, सुभाष नलावडे आदी उपस्थित होते.