91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास : विद्यार्थीदशेपासून मुक्तीलढ्यात सक्रिय कार्य
प्रतिनिधी/ फोंडा
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्यसैनिक संघटना गोवाचे माजी अध्यक्ष पांडुरंग रामचंद्र शेणवी कुंकळ्योकर (वय 91) यांचे शनिवार दि. 5 रोजी सकाळी 9 वा. वृद्धापकाळाने निधन झाले. गोवा मुक्तीलढ्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या कुंकळ्योकर यांनी शांतीनगर फोंडा येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
मूळ म्हार्दोळ कुंकळ्यो येथील पांडुरंग कुंकळ्योकर यांनी विद्यार्थी दशेत असताना वयाच्या 16 व्या वर्षी गोवामुक्ती चळवळीत उडी घेतली. त्यावेळी ते फोंड्यात शिक्षण घेत होते. पत्रके वाटणे, पोस्टर लावणे, प्रचाराचे साहित्य तयार करणे व स्वातंत्र्यसैनिकांशी समन्वय राखणे अशी कामे ते करीत. पुढील शिक्षणासाठी मुंबईत गेल्यानंतर ते एसएससी उत्तीर्ण झाले व कला शाखेच्या प्रथम वर्गात प्रवेश घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याने गोमंतभूमीच्या मुक्तीसाठी विविध स्तरावऊन दबाव वाढत होता. गोवामुक्तीच्या प्रेरणेने त्यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडले व जनार्दन शिंक्रे यांच्या नेतृत्वाखालील ‘क्वीट गोवा’ संघटनेच्या माध्यमातून बांदा येथून आपल्या भूमिगत कारवाया सुरू केल्या.
गोवामुक्तीनंतर स्वातंत्र्यसैनिकांना केंद्रात मान्यता मिळावी यासाठी त्यांनी संघटनेमार्फत विशेष प्रयत्न केले. स्वातंत्र्यसैनिक संघटना गोवाचे ते चौथे अध्यक्ष होते. जुने गोवे येथील चर्च परिसरात जुलुमी पोर्तुगीज राजवटीतील कवी कामोईश याचा पुतळा हटविण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी पुकारलेल्या आंदोलनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांच्या निधनाबद्दल स्वातंत्र्यसैनिक संघटना गोवातर्फे दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. आपण एक निकटचा सहकारी गमावला, अशी भावना संघटनेचे सरचिटणीस व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रोहिदास नाईक यांनी व्यक्त केली आहे. माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, डॉ. केतन भाटीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शांतीनगर येथील निवासस्थानी भेट देऊन कुंकळ्योकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी फोंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई व तीन नाती असा परिवार आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे पर्व असलेल्या बिहार येथील ब्रिटिश सरकार विरोधातील चंपारण सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांचा भारत सरकारतर्फे सत्कार करण्यात आला होता. सन 2017 साली नवी दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते पांडुरंग कुंकळ्योकर यांना सन्मानित करण्यात आले होते.